पैठण : कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर आज परंपरेनुसार पैठण येथे मोठ्या संख्येने वारकरी व भाविकांनी संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. भक्तांनी नाथाचरणी दुष्काळाचा सामना करण्याचे बळ दे, असे साकडे घातले. भाविक व वारकरी यांच्या उपस्थितीने नाथ मंदिर परिसर फुलून गेला होता.आषाढी व कार्तिकीला जे वारकरी पंढरपूर येथे जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत, असे वारकरी व भाविक अनेक वर्षांपासून पैठणची वारी करतात. गोदावरी स्नान करून नाथ समाधीचे दर्शन घेतात, अशी परंपरा चालत आली आहे. सोमवारी हजारोंच्या संख्येने वारकरी पैठणमध्ये दाखल झाले होते.रविवारी रात्रीपासून मराठवाडाभरातून विविध वाहनांनी वारकरी पैठणमध्ये दाखल होत होते. अनेक वारकरी पायी दिंडी घेऊन आले. यामुळे मंदिर व गोदावरीच्या तटावर एकच गर्दी उसळली. टाळ-मृदंगाच्या गजरासह ‘भानुदास-एकनाथ’च्या जयघोषाने पैठणनगरी दुमदुमली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी वारकरी, भाविक यांच्या रांगा लागलेल्या होत्या. एकादशीमुळे यात्रा भरली होती. धार्मिक वस्तू, पुस्तके, साहित्य आदींची दुकाने थाटण्यात आली होती. नाथ मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी महिला व पुरुष अशा स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या. दिवसभरात लाखभर भाविकांनी दर्शन घेतले, असे नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नंदलाल लाहोटी यांनी सांगितले.नाथ समाधीचे दर्शन घेऊन वारकरी दिंड्या शहरातील विविध मठांत, मंदिरांत विसावल्या. तेथे रात्रभर त्यांनी कीर्तन, प्रवचन, भजन करीत पांडुरंगाची भक्ती केली. यामुळे शहरभर मंदिर व मठातून हरिकीर्तनाचे स्वर निनादत होते. खरीप व रबी दोन्ही हंगामाने यंदा शेतकऱ्यांना दगा दिल्याने विवंचनेत सापडलेल्या बळीराजाने नाथ समाधीचे दर्शन घेतले व परिस्थितीचा मुकाबला करण्याचे बळ दे, असे साकडे नाथांच्या माध्यमातून पांडुरंगाला घातले.शेंदुरवाद्यातही घेतले दर्शनलिंबेजळगाव : कार्तिक एकादशी (प्रबोधिनी) निमित्त सोमवारी तुर्काबाद खराडी, शेंदुरवादा (ता. गंगापूर) येथील विठ्ठल मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.पहाटे साडेचारला मूर्तीस पंचामृतासह शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक करून दर्शनासाठी भाविकांना मंदिर खुले करण्यात आले. दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली. औरंगाबाद-नगर मार्गावर असलेल्या छोट्या पंढरपूरलाही असंख्य दिंड्या रवाना झाल्या. विठ्ठलाचा गजर करीत दर्शनाची ओढ लागलेले भाविक जयहरी विठ्ठल म्हणत मार्गस्थ होताना दिवसभर दिसून आले. स्वयंभू विठ्ठल मंदिरात कार्तिक महोत्सव सुरू असून भरगच्च कार्यक्रम होत आहेत.कार्तिकी एकादशीनिमित्त आज शहरात लाखो वारकरी व भाविकांची उपस्थिती असताना महावितरणने भारनियमन करून वारकऱ्यांना मोठा झटका दिला. विविध मंदिरात व मठात थांबलेल्या वारकऱ्यांना यामुळे असुविधेचा सामना करावा लागला.४एकादशीनिमित्त भारनियमन करण्यात आल्याने भाविकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून, यापुढे दर एकादशीला भारनियमन करू नये, अशी मागणी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे व शहरप्रमुख प्रकाश वानोळे यांनी निवेदनातून महावितरणचे सहायक अभियंता नीलेश नागरे यांच्याकडे केली आहे.
बुडत्याला मिळाले जीवनदान
By admin | Updated: November 4, 2014 01:18 IST