वाळूज महानगर : सिडको वाळूजमहानगर-४ मध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे भूखंडधारक त्रस्त झाले आहेत. सिडको प्रशासनाकडे सतत तक्रारी करूनही सुविधा पुरविण्यास टाळाटाळ केली जात असल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण आहे.
२०१६ मध्ये सिडको वाळूजमहानगर-४, गोलवाडी शिवार लिंकरोड गट नंबर ४९ मध्ये भूखंडाचे वाटप करण्यात आले होते. भूखंड खरेदी करण्यास नागरिकांनी विलंब केल्यानंतर सिडको प्रशासनाच्यावतीने १३ टक्के व्याज आकारून भूखंडाचे पैसे वसूल केले आहेत. मात्र या भागात भूखंड खरेदी करणाऱ्या नागरिकांना पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, उद्यान, पथदिवे आदी मूलभूत सुविधा अद्यापपर्यंत पुरविलेल्या नाहीत. किमान मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात यासाठी भूखंडधारकांनी सिडकोचे मुख्य प्रशासक, विभागीय आयुक्त आदींकडे सतत पाठपुरावा केला; मात्र सिडको प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप भूखंडधारक करत आहेत.