नांदेड : जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्तांचा तुटवडा असून रक्तासाठी रूग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ रक्तदान शिबिरासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे़ नांदेडात असलेल्या अत्याधुनिक रूग्णालयांमुळे लगतच्या जिल्ह्यांतील रूग्णांंचा ओढा नांदेडकडे वाढला आहे़ जिल्ह्यात एकूण सात रक्तपेढ्या आहेत़ मात्र आजघडीला प्रत्येक रक्तपेढीमध्ये बोटावर मोजता येतील एवढ्याच रक्तबाटल्या शिल्लक आहेत़ मोठा अपघात घडल्यास अनेकांना रक्ताअभावी जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे़ डायलेसिस, बाळंतपण तसेच अपघाताच्या रूग्णांना दररोज जवळपास १५० रक्तबाटल्या लागतात़ यातील ३० पेक्षा अधिक बाटल्या डायलेसिसच्या रूग्णांना लागतात़ परंतु, एवढ्या प्रमाणावर रक्तदान करणाऱ्यांची संख्या नसल्याने रक्ताचा तुटवडा वारंवार जाणवत आहे़़ त्यामुळे शहराबाहेरुन रक्तबाटल्या आयात करण्याची वेळ रक्तपेढ्यांवर येत आहे़ रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढाकार घेवून रक्तदान केल्यास हा तुटवडा भासणार नाही़ (प्रतिनिधी)जयंतीदिनी रक्तदान कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड लोकसभा युवक काँग्रेसच्या वतीने १४ जुलै रोजी नवा मोंढा येथे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तिरूपती पाटील कोंढेकर यांनी दिली़ या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन कोंढेकर यांनी केले़
जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा
By admin | Updated: July 13, 2014 00:23 IST