उस्मानाबाद : कार्यक्रम मग तो शासकीय असो अथवा निमशासकीय असो, एका व्यासपीठावर विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी आले तर राजकीय शेरेबाजी होतेच! असाच अनुभव रविवारी उस्मानाबाद येथील शासकीय रूग्णालयात आयोजित ‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरणचा शुभारंभ, शेतकरी आरोग्य शिबीर आणि आशा कार्यकर्तींच्या मेळाव्यादरम्यान आला़ पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, आ़ मधुकरराव चव्हाण यांच्यासह उपस्थितांनी आपापल्या सरकारचे काम चांगले असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करीत चांगलीच राजकीय टोलेबाजी केली़केंद्र शासनाने काही निवडक राज्यांमध्ये राष्ट्रीय लसीकरण उपक्रमांतर्गत ‘पेंटाव्हॅलंट’ लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे़ यात महाराष्ट्र राज्याचा समावेश असून, राज्यात राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा रविवारी उस्मानाबादेत प्रारंभ करण्यात आला़ यावेळी बोलताना आ़ मधुकरराव चव्हाण यांनी आपल्या खास शैलीतून सत्ताधाऱ्यांवर टीका करीत आपल्या मागण्या मांडल्या़ जिल्हा रूग्णालयासह नळदुर्गनजीकच्या रुग्णालय इमारतीला निधी कमी पडल्याने काम थांबले आहे़ ‘चौगुलेसाहेब येता-जाता आपण ते पाहता. जरा आपल्या मंत्र्यांनाही सांगत चला', असा सल्ला देताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला़ इमारतींना आम्ही मंजुरी मिळवून दिली, आता तुम्ही निधी उपलब्ध करून द्या, असे सांगतानाच शेतकऱ्यांचे प्रबोधन करा, पण त्यापेक्षाही त्यांच्या हाताला काम अन् प्यायला पाणी द्या, अशी मागणी केली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी किमान दोन-चार दिवस तरी द्यावेत, ग्रामीण भागाला भेटी द्याव्यात, अशी अपेक्षा आ. चव्हाण यांनी बोलून दाखविली. बाहेरचे अधिकारी आणून सर्वे करण्यापेक्षा घराघरात पोहोचलेल्या आशा कार्यकर्तींचे रजिस्टर तपासून उपाययोजना करा, असा टोलाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला़ शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने मेडिकल कॉलेजची मागणी करताच ‘तुम्ही ते खाजगित सांगितले तर बरे होईल’ असे सांगत त्यासाठीच ही इमारत उभा केल्याचे नमूद केले़आ़ चव्हाण यांनी ग्रामीण भागाला पालकमंत्र्यांनी भेट द्यावी, असे सांगितले होते़ यावर प्रत्युत्तर देताना डॉ. सावंत म्हणाले, जिल्ह्यात आल्यानंतर प्रारंभी यापूर्वी कोणीच मंत्री न गेलेल्या तलमोड या गावी आपण गेलो होतो़ तेथील शेतकरी कुटुंबासमोर आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे दिसून आले होते़ ग्रामीण भागाची परिस्थिती पाहूनच दुष्काळग्रस्तांसाठी शिक्षण, आरोग्य, पाणी-चारा आदी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ‘मधुकरराव, शेतकरी सुधारला पाहिजे, ही आमची भूमिका असून, त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत’, असे म्हणत डॉ़ सावंत यांनी मधुकररावांच्या कोपरखळ्यांना प्रत्युत्तर दिले. एकूणच जिल्हा रूग्णालयात आयोजित कार्यक्रमात शिवसेना आणि काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये चांगलीच जुगलबंदी दिसून आली़ पालकमंत्री सावंत यांनी चारा छावण्यांबाबत असलेले निकष शिथील करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. तसेच छावणीबाबतच्या जाचक अटीही शिथील करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली़ दरम्यान, माजी खा़डॉ़पद्मसिंह पाटील यांनी जिल्हा रूग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या संख्येत वाढ करावी, त्यांचे मानधन वाढवावे, आरोग्य सुविधा वाढवाव्यात, इमारतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागण्या मांडल्या. पगारी वाढविण्याच्या मुद्याला अनुसरून काँग्रेसचे जि.प. अध्यक्ष धीरज पाटील यांनी आरोग्य यंत्रणेचे महत्त्वपूर्ण काम घरोघरी जावून करणाऱ्या आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करावी, या मुद्याला उचलून धरले. शिवसेनेचे आ़ ज्ञानराज चौगुले यांनी, जिल्ह्यात सुरू असलेल्या शासकीय कामकाजाचे कौतुक करतानाच जिल्हा रूग्णालयातील नवीन इमारतीसाठी शासनाने इतरत्रचा अखर्चित निधी वळवून तो उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी केली़ यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुधाकर गुंड, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्यासह राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी केले़ आरोग्य संचालक डॉ़ सतीश पवार यांनी ‘पेंटवॅलंट’ लसीकरणाची माहिती दिली़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत निपाणीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी आऱबी़पवार यांनी आभार मानले़ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ़ सचिन देशमुख, डॉ़ डीक़े़पाटील, अधिपरिचारिका पानसे आदींनी परिश्रम घेतले़अधिकाधिक शासकीय योजना घरोघरी पोहोचविण्यासाठी आणि त्याचा लाभ संबंधितांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणाऱ्या आशा कार्यकर्ती व अंगणवाडीताई या प्रशासनाचा आत्मा आहेत़ अल्प मानधनावर काम करणाऱ्या या आशा कार्यकर्तींच्या मानधनात वाढ करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ़ दीपक सावंत यांनी दिली़नाटिकेने वेधले लक्ष४प्रारंभी जिल्हा शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थीनींनी १०२, १०४, १०८ अशा आरोग्याच्या विविध टोलफ्री क्रमांकाची माहिती उपस्थितांना दिली़ तर नर्सिंग कॉलेजमधील ज्ञानेश्वरी लवटे, अश्विनी गुंड, प्रज्ञा जाधव, विद्या खंडागळे, सोनाली कुंभार आणि हिरा शेळके यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित नाटीका सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले़ सावकारी जाच आणि आशा कार्यकर्तींच्या कामाचे महत्त्व या नाटीकेतून दर्शविण्यात आले़
काँग्रेसच्या कोपरखळ्या; सेनेचे प्रत्युत्तर
By admin | Updated: November 22, 2015 23:41 IST