तुळजापूर : तालुक्यातील सिंदफळ येथील अपहृत मुलीची तुळजापूर पोलिसांनी सोमवारी सुटका केली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले आहे़ तर इतर तिघा आरोपींचा शोध सुरू आहे़याबाबत अधिक वृत्त असे की, तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील एका १५ वर्षीय मुलीचे चार युवकांनी काही दिवसांपूर्वी अपहरण केले होते़ या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ अप्पर पोलीस अधीक्षक मोहन विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक आरोपींच्या शोधात फिरत होते़ शोध सुरू असताना सोमवारी सायंकाळी अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीला एक मुलगा उस्मानाबाद येथील बसस्थानकातून उस्मानाबाद- वल्लभनगर बसमधून पुण्याकडे घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्यामार्फत पथकाला मिळाली होती़ माहिती मिळताच पोउपनि. शाम बुवा यांनी बार्शी पोलिसांशी संपर्क साधून त्यांना मुलीसह त्या मुलाला ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या़ पोनि ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शाम बुवा, तपास अधिकारी फौजदार माने, संतोष करवर, कोष्टी यांच्या पथकाने बार्शीकडे धाव घेतली़ पथकाने सायंकाळी बार्शी येथून अपहृत मुलीसह त्या मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे़ अपहृत मुलीला मंगळवारी सकाळी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे़ अटक करण्यात आलेला मुलगा अल्पवयीन असून, इतर तिघांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले़ पोलिसांनी काही दिवसांतच या अपहरण प्रकरणाचा पर्दाफाश केल्याने कौतुक होत आहे.
अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका
By admin | Updated: April 15, 2015 00:41 IST