संजय जाधव, पैठणपैठण नगर परिषदेत निर्णायक बहुमत असताना काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मुस्लिमबहुल भागातून भरीव असे बळ मिळत आले आहे; मात्र काल झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव होताच न.प.च्या कार्यालयासमोर जमा होऊन याच भागातील नागरिकांनी फटाके वाजवीत विरोधात घोषणा दिल्या. विधानसभेच्या तोंडावर झालेल्या या पराभवाचे आत्मचिंतन काँग्रेसच्या वरिष्ठांनी करणे गरजेचे झाले आहे.पैठण नगर परिषदेत अडीच वर्षांपूर्वी २० पैकी १० नगरसेवक निवडून देत जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला पसंती दिली. यात मुस्लिमबहुल भागातून १० पैकी ७ नगरसेवक निवडून दिले व उर्वरित शहरातून ३ नगरसेवकांची वर्णी काँग्रेसकडून लागली होती. राष्ट्रवादीच्या पारड्यात जनतेने २ नगरसेवकांचे बळ दिले होते.पैठण नगर परिषदेचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती, जमातीसाठी राखीव होते; मात्र १० पैकी एकही नगरसेवक या प्रवर्गातील नसल्याने काँग्रेसने राष्ट्रवादी पक्षाकडून निवडून आलेले राजू गायकवाड यांना काँग्रेसमध्ये ओढून त्यांना नगराध्यक्षपदी बसवत मित्रपक्षाला धक्का दिला. वास्तविक पाहता राष्ट्रवादी हा मित्रपक्ष असल्याने अडीच वर्षे राष्ट्रवादी व अडीच वर्षे काँग्रेस अशी वाटाघाटी करूनही काँग्रेस पक्ष आज सत्तेत राहू शकत होता. २ नगरसेवकांपैकी १ नगरसेवक ओढून नेल्याने राष्ट्रवादी न. प.च्या राजकारणात दुखावली व त्याच घटनेचे पडसाद काल झालेल्या निवडणुकीत उमटले, अशी चर्चा शहरभर होत आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीचा नगरसेवक ओढत त्याला नगराध्यक्ष केले. दोन वेळेस नगराध्यक्षपदी राहिलेले जितसिंग करकोटक यांना उपनगराध्यक्षपद दिले. पैठण शहराध्यक्षपदही जितसिंग करकोटक यांच्याचकडे होते. काँग्रेसच्या १० नगरसेवकांपैकी ५ नगरसेवक मुस्लिम समाजाचे होते. या पैकी एकाला उपनगराध्यक्षपद काँग्रेसने देणे गरजेचे होते, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. येथूनच आपल्याला डावलले जात असल्याची भावना या नगरसेवकांत निर्माण झाली व काल झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारी जितसिंग करकोटक यांना घोषित होताच काँग्रेसच्या नगरसेवकांत अस्वस्थता वाढली. नगरसेवकांत असलेल्या नाराजीस जितसिंग करकोटक दूर करण्यात कमी पडले. यातून १० पैकी ६ नगरसेवकांनी काल झालेल्या निवडणुकीतून अंग काढून घेतल्याने काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेस पक्षाबाबत निर्माण झालेली परिस्थिती व गैरसमज दूर करण्याची जबाबदारी आता वरिष्ठांवर आलेली आहे. असे न झाल्यास आगामी काळात काँग्रेसची पीछेहाट अटळ आहे, असे मानले जात आहे. काँग्रेस पक्षाचा व्हीप न पाळणारे नगरसेवक आजही आम्ही पक्षासोबत आहोत, असे विधान करीत आहेत. या परिस्थितीत काँग्रेसचे वरिष्ठ या नगरसेवकांवर कारवाई करणार की आणखी दुसरी कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
अंतर्गत कलहाने काँग्रेसचा घात !
By admin | Updated: July 19, 2014 01:22 IST