विजय मुंडे उस्मानाबादमहाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रेरणादायी कामे करून समाजासमोर आदर्श निर्माण केले आहेत़ ढोकी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर मानभाव यांचे कार्यही असेच प्रेरणादायी आहे़ सपोनि मानभाव या खाकितील अधिकाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या शेतकऱ्याच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारले आहे़ तर दोन बहिणींना शिक्षणासाठी महिन्याकाठी ५०० रूपयांची शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे़मूळचे नाशिक (पंचवटी) येथील रहिवाशी असलेले सपोनि किशोर मानभाव यांनी अडचणींवर मात करीत एमपीएसस्सी मार्फत फौजदार म्हणून पोलीस दलात प्रवेश केला़ लहानपणापासून फौजदार होईपर्यंत समाजात वावरताना आलेल्या अडचणी व प्रश्नांची जाण असल्याने खाकितील या अधिकाऱ्याने गरजुंना मदतीसाठी सतत पुढाकार घेतला़ अंबाजोगाई पोलीस ठाण्यातून त्यांच्या कामाचा प्रवास सुरू झाला आणि याचवेळी त्यांनी गरजूंना मदत करण्याचे व्रतही हाती घेतले़ या ठाण्यात कार्यरत असताना महाविद्यालयीन युवकांना स्पर्धा परिक्षेबाबत, पोलीस भरतीबाबत वेळात वेळ काढून मोफत मार्गदर्शन केले़ तेथून पुढे बीड जिल्ह्यातीलच चकलंबा, पेठ बीड ठाणे येथेही कर्तव्य पार पाडले़ तेथून गेवराई पोलीस ठाण्यात काम करताना अनेक अनुभव त्यांना आले़ या काळात गेवराई येथील एका आॅईलच्या दुकानाला आग लागल्याने व्यवसायिकाचे प्रचंड नुकसान झाले होते़ गरिबीतून उभा केलेला व्यवसाय क्षणात उध्दवस्त झाल्याने तो व्यवसायिक खचला होता़ त्याला पुन्हा उभारी देण्यासाठी सपोनि मानभाव यांनी पुढाकार घेत आर्थिक मदत केली़ त्यांच्या मदतीनंतर त्या व्यवसायिकाला गेवराईतील दानशुरांनी मदत करून व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदत केली़ गेवराई पोलीस ठाण्यानंतर सपोनि किशोर मानभाव यांची उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात बदली झाली़ जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरात काम करताना सपोनि मानभाव यांनी कर्तव्यासोबत सामाजिक मदतीचे व्रत सुरूच ठेवले़ गरजुंना शालेय साहित्याचे वाटप असो अथवा एखाद्याला व्यवसायासाठी मदत करणे असो, अशा स्वरूपाची मदत त्यांनी अनेकांना केली़ डिसेंबर २०१५ मध्ये ढोकी पोलीस ठाण्याचे कामकाज सपोनि मानभाव यांच्याकडे सोपविण्यात आले़ इथे काम करताना सपोनि मानभाव यांनी आदर्श आदर्शवत काम केले आहे़ म्होतरवाडी येथील एका शेतकऱ्याने दुष्काळामुळे निर्माण झालेल्या समस्यांना कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केला होता़ ही बाब समोर आल्यानंतर मानभाव यांनी त्या कुटुंबाची भेट घेवून अडचणी जाणून घेतल्या़ केवळ मदतीचे आश्वासन दिले नाही तर त्या कुटुंबातील पुजा व विशाल या बहिण-भावाचे शैक्षणिक पालकत्वाची जबाबदारी त्यांनी स्विकारली़ गोवर्धनवाडी येथील निकिता मोटे मुलगी मोलमजुरी करून स्वत:चे व लहान बहिणीचे शिक्षण भागवित होती़ ही बाब लक्षात आल्यानंतर सपोनि मानभाव यांनी पुढाकार घेत त्यांना शैक्षणिक मदतीसाठी प्रत्येक महिन्याला ५०० रूपयांची शिष्यवृत्ती सुरू केली आहे़
खाकी वर्दीत माणुसकीचा झरा..!
By admin | Updated: December 31, 2016 23:29 IST