उस्मानाबाद : प्रवाशांना योग्य दराने तिकिटे न देता रक्कमेत अपहार केल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद आगारातील तब्बल १९ वाहकांना निलंबित करण्यात आले आहे़ तीन दिवसांपूर्वी दोघांना तर चार महिन्यात १७ जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे़ महामार्ग तपासणी पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान अपहाराचे प्रकरण समोर आले होते़ राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रवासी वाढवासारख्या विविध योजना राबविण्यात येत आहेत़ बसने प्रवास करणार्या प्रवाशांशी शौजण्याने वागण्यासह इतर बाबींसाठी वाहक-चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येते़ वाहकांना प्रवासादरम्यान योग्य दराचे तिकीट देण्यासह प्रवाशांना त्यांचे पैसे परत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत़ मात्र, काही महाठकांनी प्रवाशांना योग्य दराचे तिकीट न देता अपहार करून आपली तुंबडी भरण्याचा प्रकार सुरू केला आहे़ अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या महामार्ग तपासणी पथकात वाहकांनी केलेल्या अपहाराची साडेचार महिन्यात १९ प्रकरणे समोर आली आहेत़ विशेष म्हणजे १५ रूपयांपासून शेकडो रूपयांचा अपहार केल्याचे कारवाईतून समोर आले आहे़ महामार्ग पथकाने कारवाई केल्यानंतर ही प्रकरणे विभागीय वाहतूक अधीक्षक एस़ एस़ बिराजदार यांच्याकडे गेली़ या प्रकरणाच्या चौकशी अंती बिराजदार यांनी मिळालेल्या अधिकारांचा वार करून १९ जणांना निलंबित केले आहे़ तीन दिवसापूर्वी उस्मानाबाद आगारातील एका वाहकास २४९ रूपयांच्या तर दुसर्या वाहकास १५ रूपयांच्या अपहार प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे़ अपहार करणार्या १९ वाहकांना निलंबित केल्याने भ्रष्ट वाहकांचे धाबे दणाणले आहेत़ तर बसचा अपघात करून एखाद्या व्यक्तीस अथवा प्रवाशाच्या मरणास कारणीभूत ठरणार्यांसह वरिष्ठांशी अरेरावी करणार्या सहा चालकांना निलंबित केले आहे. (प्रतिनिधी) दोषींवर कारवाईचा बडगा अपहार करून राज्य परिवहन महामंडळाला ठकविण्याचा प्रयत्न करणार्या वाहकांवर महामार्ग पथकासह अधिकार्यांनीही कारवाईचा बडगा उगारला आहे़ या कारवाईमुळे पैसे लाटणार्या वाहकांचे धाबे दणाणले असून, प्रवासी वर्गातून मात्र समाधान व्यक्त होत आहे़ प्रवासादरम्यान प्रवाशांशी मुजोरी करणार्या वाहकांसह चालकांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे़ वाहकांच्या अपहार प्रकरणे ही महामार्ग तपासणी पथकाने केलेल्या कारवाईतून समोर आली आहेत़ कायदेशीर बाबी पाहून अपहार प्रकरणातील वाहकांना निलंबित करण्यात आले आहे़ निलंबित वाहकांची यानंतर संबंधितांची चौकशी होणार असल्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक एस़एस़बिराजदार यांनी सांगितले़ राज्य परिवहन महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी सर्व विभागातील अधिकारी प्रयत्नशील आहेत़ काही कामचुकार कर्मचारी वगळले तर इतर वाहक-चालकांसह कर्मचारीही प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे़ प्रवाशी वाढवा अभियानातील यश हे त्यामुळेच उस्मानाबाद विभागाला मिळाले आहे़ उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकातून सोडण्यात येणार्या बसेसही वेळेत सोडाव्यात, अशी मागणी होत आहे़
‘एसटी’त खाबूगिरी
By admin | Updated: May 14, 2014 00:54 IST