परभणी : जिंतूर- परभणी महामार्गावरील टाकळी कुंभकर्ण येथे काळीपिवळीचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने उलटली़ यामध्ये १३ ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले़ ही घटना ११ जून रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास घडली़ या जखमींना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ जून महिन्यात महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ १० ते १२ दिवसांत चार ते पाच अपघात झाले आहेत़ यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत़ अरुंद व खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे़ महामार्गावर अवैध वाहनांची संख्या लक्षणीय वाढली आहे़ त्यामुळेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे़ अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात आहेत़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे़ याचे सोयरसूतक कोणालाच नसल्याचे दिसून येत आहे़ याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे़जिंतूरहून काळीपिवळी जीप प्रवासी घेऊन परभणीकडे येत होती़ या जीपमध्ये १५ ते २० प्रवासी प्रवास करीत होते़ टाकळी कुंभकर्ण येथे जीप आल्यानंतर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला़ त्यामुळे जीप पलटी झाली़ जखमींना तत्काळ परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले़ जखमींची नावे अशी- दीपक प्रल्हादराव टाळके (वय ४०), रेखा दीपकराव टाळके (वय ३२), गोविंद माधवराव चव्हाण (वय ३२), अनुसयाबाई किशनराव कवडे (वय ६६), चालक धम्मदीप रमेश ननवरे (२५), नामदेव नारायण बुधवंत (४०), विशाल ननवरे (वय २२), बाबुराव भुजंग पंचांगे (४८), शीलाबाई नागनाथ फुलारे (३२), सखुबाई सुभाष मुंडे (३५), शांताबाई नाईक (३०) व बोबडे टाकळी येथील अन्य दोघांचा यात समावेश आहे़ जखमींवर परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)मालिका सुरूच आठ दिवसांपासून जिल्ह्यातील राज्य महामार्गावर अवैध वाहतुकीमुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे़ सुदैवाने जीवितहानी झाली नाही़ परंतु, अनेक जण या अपघातामध्ये जखमी झाले आहेत़ एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाला अवैध वाहतूक बंद करण्यासाठी जाग येते की काय असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे़ जिल्ह्यात अवैध वाहतूक सर्रासपणे केली जात आहे़ या अवैध वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात आहेत़ पोलिसांच्या आशीर्वादामुळेच अवैध वाहतूक बोकाळली आहे़ त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपला जीव गमविण्याची वेळ आली आहे़ जिल्ह्यातील अवैध वाहतूक बंद होणे गरजेचे आहे़ मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे़
काळीपिवळीला अपघात
By admin | Updated: June 12, 2014 00:06 IST