अनुराग पोवळे, नांदेडविधानसभा निवडणुकीपूर्वीच होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आता अन्य पक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापनेच्या हालचाली करीत आहे़ अडीच वर्षांपूर्वी सत्ता स्थापनेत आघाडीला मदत करणाऱ्या भाजपाला व चिखलीकर गटाला मात्र यावेळी सत्तेतून बाहेर राहण्याची वेळ येणार आहे़नांदेड जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसकडे अध्यक्षपद राहणार आहे़ जिल्हा परिषदेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता काँग्रेसचे २५, काँग्रेस सहयोगी २, राष्ट्रवादी पक्षाचे १८, शिवसेनेचे ९, भाजपाचे ४, चिखलीकर गट अर्थात तत्कालीन लोकभारतीचे ४ आणि भारिप १ सदस्य आहे़ त्याचवेळी उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आहे़ यावेळीही काँग्रेस पक्षाचाच अध्यक्ष होणार हे निश्चित़ अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव अध्यक्षपदासाठी बळीरामपूर गटातून निवडून आलेल्या मंगलाताई गुंडिले आणि करखेली गटातील काँग्रेस सदस्या सिंधुताई कमळेकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे़ यातही आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काँगेस धर्माबाद तालुक्याला प्रथमच अध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे़ गुंडिले यांच्याकडूनही प्रयत्न केला जात आहे़ त्यात माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांचा शब्द अंतिम राहणार आहे़ एकूण ६३ सदस्यसंख्या असलेल्या जि़प़त सत्तास्थापनेसाठी ३२ सदस्यांची गरज राहणार आहे़ काँग्रेस २५, सहयोगी २ आणि राष्ट्रवादीचे १८ असे एकूण ४५ असे स्पष्ट बहुमत आघाडीकडे आहे़ त्यामुळे अन्य पक्षांची मदत यावेळी काँग्रेसला उरली नाही़ परिणामी सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाला मात्र यावेळी सत्तेबाहेर रहावे लागणार आहे़दुसरीकडे उपाध्यक्षपद सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाईक गटाकडे आहे़ त्यामुळे आगामी काळात उपाध्यक्षपद हे धोंडगे गटाला देण्याची मागणी पुढे आली आहे़ हे उपाध्यक्षपद देतानाही आगामी विधानसभेच्या दृष्टीनेच रणनिती निश्चित केली जात आहे़ विधानसभा निवडणुकीपूर्वी होत असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला मोठे महत्व आले आहे़ अडीच वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेदरम्यान काँग्रेसने राष्ट्रवादीसह लोकभारती अर्थात चिखलीकर गट, भाजपासह अपक्षांची मदत घेतली होती़ या सत्तास्थापनेदरम्यान भाजपालाही एक सभापतीपद मिळाले होते़ तसेच चिखलीकर गटालाही प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या रूपाने सभापतीपद मिळाले होते़मात्र मागील कालावधीत घडलेल्या राजकीय घडामोडी आणि आगामी विधानसभेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा एक गट अप्रत्यक्षरित्या सत्तेबाहेरच आहे़ त्या गटालाही यावेळी सत्तेत सामावून घेण्याच्या दृष्टीने काँग्रेसकडून हालचाली सुरू आहेत़ यात आणखी एक सभापतीपद राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे़ २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीनंतर होणाऱ्या सभापती निवडणुकीत काँग्रेसला २ आणि राष्ट्रवादीला २ सभापतीपद देवून जि़ प़ तील समीकरण समतोल करण्याचा प्रयत्न राहणार आहे़ उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादीच्या धोंडगे गटाकडून दिलीप धोंडगे यांच्यासह विद्यमान सभापती संजय पाटील कऱ्हाळे यांचेही नाव आहे़ तर सभापतीपदासाठी मुदखेड तालुक्यातील मुगट गटाचे रोहिदास जाधव, बाबूराव गिरे, जयश्री पावडे, वर्षा भोसीकर, वंदना लहानकर, मोहन पाटील टाकळीकर, दिनकर दहिफळे, बंडू नाईक आदींची नावे पुढे आली आहेत़ (प्रतिनिधी)
जि़प़त भाजपा सत्तेबाहेर जाणार
By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST