उस्मानाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनास जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी ३० जून रोजी भेट देऊन १५ दिवसांत इमारतीचे अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या तसेच न्यायभवनमधील सांस्कृतिक सभागृहामध्ये (इको) ध्वनी प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही या कामाला सुरूवात झाली नसल्याचे समाजकल्याण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.साडेचार कोटी रुपये खर्चून ग्रामीण पोलीस ठाण्याच्या मागे सामाजिक न्यायभवन उभारण्यात आले आहे. मात्र याची बहुतांश कामे अर्धवट असल्याने वर्षभरापासून ते वापरात येऊ शकले नाही. अपूर्ण कामावरुन समाजकल्याण व बांधकाम विभागामध्ये टोलवाटोलवी सुरु असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २६ जून रोजी प्रसिध्द केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी ३० जून रोजी सदरील इमारतीची पाहणी करुन १५ दिवसात कामे पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या होत्या. या इमारतीतील सांस्कृतिक सभागृहामध्ये ध्वनीप्रदुषण कमी होण्याच्या दृष्टीने अदांजपत्रक सादर करण्यास तसेच बगिचा, नालीचे झाकण टाकून हौदासारख्या कुंड्यांची व्यवस्था करण्याचे अंदाजपत्रक सादर करा असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. याबरोबरच इतर अर्धवट कामाबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले होते. मात्र, ही कामे अद्यापही रखडली असल्याचे दिसते. (प्रतिनिधी)
तंबीनंतरही न्यायभवनाचे काम अपूर्णच
By admin | Updated: July 24, 2014 00:13 IST