वाळूज महानगर : पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेले जोगेश्वरीतील प्रेमीयुगुल पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे. एमआयडीसी वाळूज पोलिसांनी या प्रेमीयुगुलाला लातूर जिल्ह्यातील शिवली गावातून ताब्यात घेतले आहे.
वाळूज एमआयडीसी परिसरातून ७ डिसेंबरला आरोपी मारुती साहेबराव चुनवडे (२८, रा. नांदेड) याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले होते. तिच्या पालकांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन मारुती चुनवडे याने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव यांनी या प्रेमीयुगुलाचा शोध सुरु केला होता. मात्र, आरोपी मारुती चुनवडे याला पोलीस मागावर असल्याचे लक्षात येताच तो मोबाईल बंद ठेवून सतत ठिकाण बदलत होता. मारुती चुनवडे याने मुलीला लातूर जिल्ह्यातील शिवली गावात एका शेतवस्तीवर ठेवले होते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी आरोपी मारुती हा मित्राचे सीमकार्ड वापरुन नातेवाईक व मित्रमंडळीच्या संपर्कात होता. तांत्रिक तपासाच्या आधारे एमआयडीसी वाळूज पोलिसांना हे प्रेमीयुगुल लातूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस नाईक विनोद परदेशी, हेडकाॅन्स्टेबल धनेधर आदींच्या पथकाने शुक्रवारी लातूर जिल्ह्यात सापळा रचला. शिवली गावात शेतवस्तीवर छापा मारुन पोलीस पथकाने आरोपी मारुती चुनवडे याला पकडून त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली. आरोपी चुनवडे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
------------------------------