परभणी: परभणी महानगरपालिका स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसला गुंगारा दिला. काँग्रेसचे शिवाजी भरोसे यांचा ८ विरुद्ध ६ मतांनी पराभव करीत राष्ट्रवादीचे विजय जामकर यांनी सभापतीपदाची हॅट्ट्रीक पूर्ण केली.सभापती निवडीसाठी २५ जुलै रोजी सकाळी येथील बी.रघुनाथ सभागृहात स्थायी समिती सदस्यांची बैठक सभापती निवडीसाठी आयोजित केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विद्यमान सभापती विजय जामकर यांनी तर काँग्रेसकडून शिवाजी भरोसे यांनी उमेदवारी दाखल केली होती. या स्थायी समितीत राष्ट्रवादी काँग्रेस ८, काँग्रेस ६ आणि शिवसेनेचे २ असे बलाबल होते. दोघेही उमेदवार राजकीयदृष्ट्या प्रबळ दावेदार असल्यामुळे निवडणुकीचा निकाल काय लागतो, याकडे लक्ष लागले होते. हात उंचावून मतदान घेण्यात आले. विजय जामकर यांना ८ तर भरोसे यांना सहा मते मिळाली. शिवसेनेचे उदय देशमुख आणि संगीता कलमे हे दोन सदस्य तटस्थ राहिले. पीठासन अधिकारी संभाजी झावरे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. दोन मतांच्या फरकाने विजय जामकर हे सभापतीपदी विराजमान झाले. या मतदान प्रक्रियेत व्यंकट डहाळे, अ.फातेमा अ. जावेद, बद्रुनिसा बेगम एकबाल अहेमद, रामराव गुजर, सुदामती थोरात, रेखा कानडे, अ.मेहराज अ.माजीद यांनी विजय जामकर यांना मतदान केले. शिवाजी भरोसे यांना खाजा सय्यद अ.माजीद जहागीरदार, संगीता दुधगावकर, वनमाला देशमुख, शारदाबाई मोरे, गणेश देशमुख आणि स्वत:चे असे सहा मते पडली. यावेळी उपायुक्त रणजीत पाटील, नगरसचिव चंद्रकांत पवार, कोलकणे आदी उपस्थित होते.राष्ट्रवादीने शब्द पाळला नाही-वाघमारे लोकसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, अजीत पवार आदी नेत्यांच्या उपस्थितीत स्थायी समितीचे सभापतीपद काँग्रेसला देण्याचे ठरले होते. तसे पत्र आम्ही काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना दिल्यावर माणिकराव ठाकरे यांनी या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना पत्र देऊन या निर्णयाची आठवण करुन दिली होती. राष्ट्रवादीच्या नेते मंडळींनीही या निवडीच्या वेळी संबंधितांशी संपर्क साधून काँग्रेसला सहकार्य करण्याचे सांगितले होते. परंतु, काही नेते मंडळींनी तसे घडू दिले नाही, अशी प्रतिक्रिया मनपा गटनेते भगवान वाघमारे यांनी दिली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने परभणी विधानसभा मतदारसंघात भरपूर सहकार्य करुन राष्ट्रवादीला ९ हजारांची आघाडी मिळवून दिली. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश परभणी जिल्ह्यातील ‘सैनिक नेते मंडळींनी’ काँग्रेसचा सभापती होऊ दिला नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शिवाजी भरोसे यांनी व्यक्त केली. लागोपाठ तिसऱ्यांदा मला सभापतीपदी निवडून देऊन माझे नगरसेवक सहकारी आणि पक्षनेते माजी राज्यमंत्री सुरेश वरपूडकर, महापौर प्रताप देशमुख, उपमहापौर सज्जुलाला यांनी माझ्यावर विश्वास दर्शविला. परभणी शहराच्या विकासासाठी मी कठीबद्ध आहे, अशी प्रतिक्रिया सभापती विजय जामकर यांनी व्यक्त केली.
जामकरांची हॅट्ट्रीक
By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST