श्रीनगर : कलम ३७० रद्द केल्यानंतर व राज्याचे पुनर्गठन केल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच होत असलेल्या निवडणुकीची सज्जता झाली आहे. जिल्हा विकास परिषद (डीडीसी)च्या निवडणुका शनिवारपासून सुरू होत आहेत.
डीडीसीच्या निवडणुका आठ टप्प्यांत होणार असून, यात २८ नोव्हेंबर ते २२ डिसेंबरपर्यंत २० जिल्ह्यांतील २८० सदस्यांची निवड होईल. केंद्रशासित राज्यात निर्वाचित सरकारच्या अनुपस्थितीत होणाऱ्या या निवडणुकांत परिषद क्षेत्रात प्रशासनाची नवीन फळी तयार करतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, डीडीसी बरोबरच १२,१५३ पंचायत क्षेत्रांतील पोटनिवडणुकाही होत आहेत. यात ११,८१४ क्षेत्र काश्मीर खोऱ्यात तर उर्वरित ३३९ जम्मूमध्ये आहेत.
पहिल्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी संपला व मतदान घेण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊनही काही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १४७५ उमेदवार मैदानात उतरलेले आहेत. आठ टप्प्यांत होत असलेल्या या निवडणुकांत पीजीएडी, भाजप व माजी वित्तमंत्री अलताफ बुखारी यांच्या पक्षामध्ये त्रिकोणी मुकाबला होण्याची शक्यता आहे.
२०१८मध्ये पंचायत निवडणुकांवर बहिष्कार टाकणारे मोठे प्रादेशिक पक्ष नॅॅशनल काॅन्फरन्स (एनसी), पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी), गुपकर आघाडीच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरलेले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकूण २६४४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून, या टप्प्यात ७ लाख ३ हजार ६२० मतदार आपला अधिकार बजावणार आहेत. पहिल्या टप्प्यात मतदान सकाळी ७ वाजता सुरू होऊन दुपारी २ वाजेपर्यंत चालेल. राज्य निवडणूक आयुक्त के. के. शर्मा यांनी काश्मीर प्रवासींसाठी जम्मू व उधमपूरमध्ये विशेष मतदान केंद्रे तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या निवडणुकीत कोरोनाच्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करण्यात येणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.