संजय कुलकर्णी , जालनाजबाबदार अधिकाऱ्यांपैकी कुणाचेच नियंत्रण नसल्याने एस.टी. महामंडळाच्या जालना आगाराचा कार्यभार विस्कळीत झाल्याचा प्रकार गुरूवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टींग आॅपरेशनद्वारे उघडकीस आला. आगाराचा कार्यभार वाऱ्यावर सोडल्याने कुणाचा-कुणाशी ताळमेळ दिसून आला नाही. नियोजनाअभावी लांबपल्ल्याच्या काही बसगाड्या रद्द कराव्या लागल्या, तर काही गाड्या उशिराने धावल्या. त्यामुळे प्रवाशांची मात्र मोठी गैरसोय झाल्याचेही दिसून आले.जिल्ह्याचे ठिकाण असल्याने जालना आगारात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागातील अनेक प्रवाशी लांबपल्ल्याच्या प्रवासाकरीता या बसस्थानकावर येऊन आपल्या नियोजित ठिकाणी जातात. मात्र, जालना आगारात प्रमुख पदांवरील अधिकारी या - ना त्या कारणाने दीर्घ रजेवर असल्याने त्यापैकी बहुतांश जणांचा कारभार सध्या वाहकांच्या हाती आहे. गुरूवारी दुपारी २ वाजता स्थानकात पोहोचल्यानंतर या सर्व बाबी समोर आल्या.आगार व्यवस्थापक गेल्या दोन महिन्यांपासून आजारपणामुळे रजेवर असल्याने त्यांचा कार्यभार व्ही.एस. वाकोडे यांच्याकडे आहे. स्थानकप्रमुखांसह दोन्ही वाहतूक निरीक्षकही सध्या रजेवर आहेत. त्यामुळे नियंत्रण कक्ष, स्थानकप्रमुख कार्यालय, सेवा नोंदणी या विभागांचा कार्यभार काही वाहकांकडे आहे. काही लिपिक व वाहतूक नियंत्रकाच्या जागेवर वाहकच काम करताना आढळून आले.स्थानकातील वाहक-चालकांच्या आरामगृहातील अस्वच्छतेबद्दल विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांना विचारणा केली असता त्यांनी तेथे तातडीने स्वच्छता केली जाईल असे सांगितले. या अस्वच्छतेचा प्रकार सतत असतो, अशी माहिती दिल्यानंतर याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे विभाग नियंत्रण खिरवाडकर यांनी सांगितले. आगारप्रमुख प्रभारी कार्यभार असलेले व्ही.एस. वाकोडे यांनी आगारातील सर्वच कारभार वाहकांकडे नाही, असे सांगून सध्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरीही लग्नसमारंभ असल्याने ते सुटीवर असल्याने ड्युटी देताना तारांबळ होत असल्याचे मान्य केले. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे आहे. काम व्यवस्थित करण्याबाबत ठेकेदारास अनेकवेळा सूचना देण्यात आलेल्या असल्याचेही ते म्हणाले.आगारामध्ये मागील बाजूस एस.टी. पुरूष वााहक-चालकांसाठी आरामगृह आहे. मात्र या आरामगृहाच्या आवारापासून कचरा, घाणीच्या साम्राज्याला सुरूवात होते. प्रवेशद्वारासमोर कचरा, आतमध्ये गेल्यानंतर या कचऱ्यामध्येच कर्मचारी आराम करताना दिसून आले. स्वच्छतागृहांमध्येही कचरा दिसून आला. ४याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता येथे साफसफाई होत नाही, असे उत्तर मिळाले. येथे पंख्यांची संख्याही कमी आहे. घाण, दुर्गंधीमध्येच कर्मचाऱ्यांना आराम करावा लागत असल्याचे दिसून आले. ४या आरामगृहासमोर झाडाखाली सिमेंट बाकावर बसून कर्मचारी जेवण करतात. मात्र या ठिकाणी देखील अस्वच्छता आहे. स्वच्छतेचे काम ठेकेदाराकडे दिलेले आहे. परंतु स्वच्छता कधीच होत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
जालना आगाराचा कारभार विस्कळीत
By admin | Updated: May 22, 2015 00:31 IST