लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बिलाच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने जिल्ह्यातील १,३८७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांचा विद्युत प्रवाह कापला. परिणामी मागील आठ ते दहा दिवसांपासून ग्रामस्थांवर भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तथापि, आज शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी महावितरणच्या प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांची भेट घेऊन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बकोरिया यांनी सोमवारी परत भेटण्याची ग्वाही दिल्यामुळे वीज जोडणीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महावितरण कंपनीने सध्या थकबाकी वसुली मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना ७५ हजार ते २ लाखांपर्यंतचे उत्पन्न मिळते. असे असताना त्या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा योजनांचे वीज बिल मात्र १५ ते २० लाखांपर्यंत देण्यात आले आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना मिळणारा महसूल कमी व बिलांची रक्कम लाखोंच्या घरात असल्यामुळे त्या वीज बिलाचा भरणा करू शकल्या नाहीत. परिणामी महावितरण कंपनीने तब्बल १,३८७ ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांची वीज कापली आहे.महावितरण कंपनीने या सर्व योजनांकडे २३ कोटी ८५ लाख रुपयांची निव्वळ थकबाकी दाखवली असून, त्यावर १३ कोटी ८९ लाख रुपयांचे व्याज वेगळेच. याशिवाय चालू महिन्याच्या बिलाची रक्कम ही २९ लाख रुपये एवढी आहे. वास्तविक या संपूर्ण पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची थकबाकी २४ कोटी १४ लाख रुपये एवढी आहे.
जिल्ह्यात १,३८७ पाणीपुरवठा योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:12 IST