गेवराई : महामार्गालगत सुरू असलेल्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात प्रवाशांना घेऊन निघालेला रिक्षा घुसली. या अपघातात एक जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजता सावरगाव येथे घडली. कचरू लक्ष्मण शेवाळे (वय-४० रा. सोमटाळा जि. अहमदनगर) असे मयताचे नाव आहे. भगवान सूर्यभान नागरगोजे, विठ्ठल गोपाल इंगोले (दोघे रा. सावरगाव), कृष्णा रघुनाथ गायकवाड, सखूबाई रघुनाथ औटी (दोघे रा. जोडमालेगाव ता. गेवराई) व अन्य एक यांचा जखमीत समावेश आहे. कल्याण- विशाखापट्टणम् या राष्टÑीय महामार्गावरील सावरगाव येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. सोमवारी पहाटे हा कार्यक्रम ऐन रंगात आलेला असताना राहुरी येथून गेवराईकडे निघालेली रिक्षा (क्र. एम.एच.१७ ई- ७४४१) च्या चालकाचा ताबा सुटल्याने थेट जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात घुसली. यावेळी भाविकांच्या बाजूला दुचाकी उभ्या होत्या. रिक्षा त्या दुचाकींना चिरडून भाविकांच्या गर्दीत घुसली. त्यामुळे रिक्षाचा वेग कमी झाला. अन्यथा आणखी काही भाविक चिरडले गेले असते, असा अंदाज प्रत्यक्षदर्र्शींनी व्यक्त केला. घटनेनंतर फौजदार पठाण, पो.कॉ. वाहेद पठाण यांनी घटनास्थळी भेट दिली. रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. (वार्ताहर)
जागरण गोंधळात घुसली रिक्षा
By admin | Updated: May 20, 2014 01:10 IST