माधवी वाकोडकर, औरंगाबाद हिंदी चित्रपट सृष्टीतील महानायक बिग-बी यांच्यासोबत काम करण्याची आपल्याला संधी मिळाली, ही फार मोठी बाब आहे. त्यांच्यासोबत काम करण्याची मजाच निराळी असल्याचे मत ‘भूतनाथ रिटर्न्स’मधील बाल कलाकार अकरोठ ऊर्फ पार्थ भालेराव याने व्यक्त केले. गरवारे कम्युनिटी सेंटरच्या गरवारे बाल भवन प्रस्तुत नाट्यचित्रपट कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी तो आज औरंगाबादेत आला होता. यावेळी लोकमतशी बोलताना त्याने आपल्या छोट्याशा चित्रपट कारकीर्दीचा आढावा घेतला. लहानपणापासूनच मला नाटक आणि चित्रपटांचे भरपूर आकर्षण होते. २०१० मध्ये इयत्ता सातवीत शिकत असताना शाळेच्या स्नेहसंमेलनात एक नाटिका सादर केली. शिक्षक व प्रेक्षकांनी माझा अभिनय पाहून कौतुकाची थाप दिली. येथूनच माझा खरा प्रवास सुरू झाला. याचवर्षी थेट मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला. ‘खाली डोकं वर पाय’ या मराठी चित्रपटातून सिनेसृष्टीत प्रवेश केला. अभिनय आणि अभ्यासाची सांगड घालत अभिनय क्षेत्रात वेगळी छाप सोडण्याचे आव्हान होते. ‘संत तुकाराम’ या चित्रपटात अवघ्या दहा मिनिटांच्या वारकर्याच्या मुलाची भूमिका साकारली. याच चित्रपटाने मला अभिनय सिद्ध करता आला. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भूतनाथ रिटर्न्स’ने मला एक वेगळे विश्व दाखवले. या चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली. या चित्रपटासाठी माझी निवड करण्यात आल्याचे समजताच माझ्याबरोबरच माझ्या आई आणि वडिलांचा आनंद गगनाला मावत नव्हता, असेही पार्थने हसत हसत सांगितले. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना अमिताभ बच्चनसोबत गप्पाटप्पा, कामाच्या टिप्स घेणे, अशी खूप मजा येत होती. चुका समजावून सांगण्याची बच्चन यांची तºहाच निराळी आहे. चित्रपटात काम करणे एवढे सोपे नसते. अभिनयाचे धडे गिरविण्यासाठी काही वर्कशॉप्समध्ये जाऊन अभ्यास केल्याचेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने प्रांजळपणे मान्य केले. आगामी चित्रपटांबद्दल त्याला छेडले असता तो अत्यंत विश्वासाने सांगत होता की, अविनाश जाधव निर्मित ‘किल्ला’ हा जानेवारीत प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माझी ‘मनू’ नावाच्या एका नॉटी मुलाची भूमिका आहे.
बिग-बीसोबत काम करण्याची मजाच निराळी!
By admin | Updated: May 19, 2014 01:30 IST