औरंगाबाद : राजकारणात सध्या चांगल्या माणसांची कमी आहे. कोणत्याही मार्गाने सत्ता मिळविणे आणि सत्तेतून सर्वकाही मिळविणाऱ्यांचीच संख्या जास्त आहे. राजकारणातील चांगुलपणा टिकवून ठेवायचा असेल, तर राजेंद्र दर्डा यांच्यासारख्या ‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे आवाहन उद्योजक मानसिंग पवार यांनी व्यापारी महासंघाच्या बैठकीत केले. औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ आणि विविध व्यापारी संघटनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. याप्रसंगी काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा, मराठवाडा चेंबर्स आॅफ रेड अँड कॉमर्सचे माजी अध्यक्ष तनसुख झांबड, मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे, व्यापारी महासंघाचे मार्गदर्शक झोयब येवलावाला यांची भाषणे झाली. सुरुवातीला राजेंद्र दर्डा यांच्या ‘व्हिजन औरंगाबाद’ या जाहीरनाम्यावर आधारित माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. मानसिंग पवार पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ ही जाहिरात टीव्हीवर दाखविण्यात येत होती; परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांनी जाहिरातीला त्यांच्याच पद्धतीने; परंतु अत्यंत सकारात्मक उत्तर दिले. त्यामुळे भाजपाला त्या जाहिराती बंद कराव्या लागल्या. गेल्या पंधरा वर्षांतील महाराष्ट्राचा विकासदर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वांत जास्त आहे. औद्योगिक क्षेत्रात जेवढा विकास महाराष्ट्रात झाला तेवढा कुठल्याच राज्यात झाला नाही. एवढेच काय तर, इतर राज्यांतील लोक वास्तव्यासाठी फक्त महाराष्ट्रालाच पसंती देतात. त्यामुळे जे विचारतील कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, त्यांना एकच सांगा, सातासमुद्रापार जाऊन पोहोचलाय महाराष्ट्र माझा. मानसिंग पवार यांच्या या आवाहनाला सर्व व्यापारी बांधवांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. राजेंद्र दर्डा यांनी विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडला. घाटीतील मेडिसीन विभागाची अत्याधुनिक इमारत, एमआयसीयू, एनआयसीयू, महाराष्ट्रातले पहिले कॅन्सर हॉस्पिटल अशा आरोग्य सुविधा आज शहरात निर्माण झाल्या आहेत. विभागीय क्रीडा संकुल, सिडको नाट्यगृह, आंतरराष्ट्रीय विमानतळ यासह गुंठेवारी भागातील विकासकामांमुळे औरंगाबादची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. भविष्यातील औरंगाबाद कसे असावे, याचे व्हिजन आम्ही ५२ हजार नागरिकांच्या संकल्पनांतून मांडले आहे. येणाऱ्या काळात अत्याधुनिक महानगर बनविण्यासाठी मी काम करणार असल्याची ग्वाही दर्डा यांनी दिली. मसिआचे अध्यक्ष भारत मोतिंगे म्हणाले की, राजेंद्र दर्डा यांच्यामुळेच डीएमआयसी औद्योगिक प्रकल्प औरंगाबादेत आला आहे. त्यामुळे येणारा काळ व्यापाऱ्यांसाठी सुवर्णकाळ असणार आहे. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा म्हणाले की, व्हिजन असलेला नेता सोबत असल्याने व्यापाऱ्यांना काळजी करण्याचे कारण नाही. बैठकीला मसिआचे उपाध्यक्ष अशोक बेडसे पाटील, व्यापारी महासंघाचे सचिव राजन हौजवाला, संजय कांकरिया, मदन जालनावाला, सुभाष दरख, हरिसिंग, हरिभाऊ पवार, राजकुमार भाटिया, राकेश सोनी, शिवशंकर स्वामी, अर्जुन राऊत, मुकेश मुगळे, विकास पाटणी, आदेशपालसिंग छाबडा आदींसह विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘अच्छा आदमी’च्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य
By admin | Updated: October 13, 2014 00:35 IST