बीड : मुंबईत सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना बुधवारी रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. शहरातील तुळजाई चौक भागात ही कारवाई करण्यात आली. विशाल रमेश जाजू व संदीप सर्जेराव मोराळे या दोघांना अटक केली आहे. मुंबईत बुधवारी मुंबईविरुद्ध बंगळुरू यांच्यात आयपीएलचा २०- टष्ट्वेंटी क्रिकेट सामना होता. या सामन्यावर सट्टा सुरु असल्याची माहिती अधीक्षक अनिल पारसकर यांच्या पथकाचे प्रमुख सहायक निरीक्षक गजानन जाधव यांना मिळाली होती. त्यावरुन त्यांनी तुळजाई चौकामधील यशराज किराणा दुकानात सापळा लावला. यावेळी दोन आरोपींना पकडले. त्यांच्याकडून संगणक व रोख रक्कम असा ९० हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईने सट्टेबाजांत एकच खळबळ उडाली. (प्रतिनिधी)