कुरूंदा : वसमत तालुक्यातील कुरूंदवाडी येथे २४ जून रोजी शिक्षकांनी प्राथमिक शाळा न उघडल्यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप लावले. त्यासंदर्भात विस्तार अधिकारी पेडगावकर, केंद्रप्रमुख जाधव यांनी शाळेला भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा करून मध्यस्थी केली. दरम्यान, २६ जून रोजी गटशिक्षणाधिकारी बगाटे यांनीही शाळेला भेट देवून शाळा बंद का ठेवली? याची चौकशी करून लेखी खुलासा सादर करण्याचा आदेश दिला आहे. शाळा न उघडण्याचा प्रकार चव्हाट्यावर येवून कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकारामुळे या भागातील इतर शाळेतील शिक्षकांनी धसकी घेतली आहे. त्यामुळे परिसरातील शाळा वेळेवर उघडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न स्वत: शिक्षक करताना दिसत आहेत. या भागात बसच्या वेळापत्रकाप्रमाणे शाळा उघडणे व बंद करणे नित्याचे झाले असून प्रार्थनेच्या वेळेवर बहुतांश शिक्षक गैरहजर राहत असल्याचे चित्र आहे. असे असताना त्यांच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी शिक्षण विभागाने भरारी पथक नेमण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)
अधिकाऱ्यांकडून चौकशी
By admin | Updated: June 30, 2014 00:40 IST