औरंगाबाद : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीतील घोटाळ््याच्या दोन प्रकरणांची चौकशी राज्य अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) सोपविण्यात आली आहे. दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याच्या दोन तक्रारी सिडको ठाण्यात दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारींचा तपास आता ‘सीआयडी’ करणार आहे.भालचंद खोंडे (रा. जयभवानीनगर) आणि मच्छिंद्र सुरासे (रा. एन-६, सिडको) यांनी काही दिवसांपूर्वी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली होती. भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या सिडको एन- ६ येथील शाखेत गुंतवणूक केल्यास १३ टक्के व्याज दिले जाईल, असे आमिष संस्थेचे संचालक, सदस्य व कर्मचाऱ्यांनी दाखविले होते. त्यानंतर खोंडे आणि सुरासे या दोघांनी मिळून २ लाख ८,७६८ रुपये पतसंस्थेच्या ‘फिक्स डिपॉझिट’ खात्यात १७ एप्रिल २०१३ रोजी गुंतविले होते. १७ एप्रिल २०१४ रोजी मुदत संपल्यानंतर त्यांना व्याजासह ही रक्कम परत मिळणे अपेक्षित होते, परंतु रक्कम न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.रायसोनी पतसंस्थेविरुद्धच्या तक्रारीचा तपास सिडको पोलीस ठाण्याकडून काढून ‘सीआयडी’ कडे सोपविण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे.उपअधीक्षक सुधाकर सुरडकर यांनी तपासास प्रारंभ केला आहे. ‘रायसोनी पतसंस्थेच्या सिडको शाखेकडून फसवणूक झालेल्या नागरिकांनी ‘सीआयडी’ कार्यालय, पोलीस भवन, कौटुंबिक न्यायालयामागे, या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन सुरडकर यांनी केले आहे.
तपास ‘सीआयडी’कडे
By admin | Updated: August 31, 2016 00:39 IST