पैठण : पैठण शहरात विना परवानगी लावण्यात आलेले डिजिटल बॅनर व होर्डिंग नगर परिषद प्रशासनाने काढून जप्त केले आहेत. यापुढे बॅनर होर्डिंग लावायचे झाल्यास नगर परिषदेने आचारसंहिता लागू केली असून, यासाठी शुल्कसुद्धा नगर परिषदेकडे जमा करावे लागणार आहे. नपच्या या नवीन धोरणामुळे चमचेगिरी करणाऱ्या पोस्टर पुढाऱ्यांना लगाम लागणार आहे.शहरात विविध चौक, मोक्याचे रस्ते, रस्त्यावरील खांब आदी ठिकाणी डिजिटल पोस्टर, बॅनर, होर्डिंग लावून स्वत:ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर करण्यात येत होती. यामुळेच शहराचे विद्रुपीकरण तर होतेच शिवाय विद्युत खांबांवर लावण्यात आलेल्या होर्डिंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. मनमानी व गैरलागू होणारे मजकूर टाकून वाढदिवस, सण उत्सवाच्या शुभेच्छा या डिजिटल होर्डिंगद्वारे देण्यात येत होत्या. प्रसंगी या मजकुरावरून या होर्डिंगवरून वादाचे प्रसंग निर्माण होत होते. यामुळे नगर परिषद प्रशासनाने याबाबत आचारसंहिता तयार केली आहे, असे नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांनी सांगितले.यापुढे होर्डिंग लावण्यासाठी न.प. प्रशासनाची लेखी परवानगी घ्यावी लागणार आहे. शिवाय संबंधित जागेच्या मालकाची लेखी अनुमती घ्यावी लागणार आहे. यासाठी न.प.ने. शुल्क लागू केले असून जितक्या दिवस होर्डिंग ठेवायचे तितक्या दिवसाचे शुल्क परवानगीच्या वेळेस भरावे लागणार आहे. या बॅनरवर न.प.ने दिलेल्या परवानगीचे स्टीकर लावणे बंधनकारक आहे. विना परवानगी होर्डिंग लावल्यास संबंधितांविरुद्ध व जागा मालकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून जागा मालकाच्या नावावर दंड आकारण्यात येणार आहे. शिवाय गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले. (वार्ताहर)
अवैध होर्डिंग, पोस्टर्स काढले
By admin | Updated: September 5, 2014 00:51 IST