विजय सरवदे, औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘अ’ मानांकन मिळविण्यामध्ये ग्रंथालयाचा सिंहाचा वाटा आहे. अत्याधुनिक संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून ग्रंथलयाने हायटेक भरारी घेत केवळ राज्यात नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर लौकिक मिळविला आहे. यासंदर्भात खास ‘लोकमत’शी बोलताना ग्रंथपाल डॉ. धर्मराज वीर म्हणाले की, आम्ही एवढ्यावरच समाधानी नाहीत, तर विद्यापीठाचे हे ग्रंथालय आंतरराष्ट्रीय दर्जाचे साकारण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. डॉ. वीर यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे-प्रश्न : ग्रंथालयात अत्याधुनिक प्रणाली आणण्याची प्रेरणा कशी मिळाली?उत्तर : विद्यापीठात ‘नॉलेज रिसोर्स सेंटर’ सुरू करण्याची सुरुवात सन २०११ पासून झाली. विद्यापीठाला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यासाठी तत्कालीन कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्या सूचनेनुसार गं्रथालयात माहिती व तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्यास सुरुवात झाली. तंत्रज्ञानाचा पुरवठा करणाऱ्या विविध संस्थांशी संपर्क साधून ‘हायटेक प्रणाली’ समजून घेतली. ज्या प्रणालीचा वापर ग्रंथसंपदा, विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांच्या दृष्टिकोनातून योग्य वाटली, तिचा ग्रंथालयात वापर सुरू करण्याचा निर्णय घेतला. प्रश्न : सद्य:स्थितीत ग्रंथालयामध्ये कोणकोणत्या अत्याधुनिक सुविधा आहेत?उत्तर : ग्रंथालयाने संगणकीय वापरामध्ये आज तरी मोठी आघाडी घेतली आहे. ग्रंथालयात सध्या इंटरनेट लॅब, स्मार्ट कार्ड, वेब कॅफे मॅनेजमेंट, सीडी- डीव्हीडी मिरर सर्व्हर, सीडी- डीव्हीडी स्टोअरेज मॅनेजमेंट, सोल स्वॉफ्टवेअर, वर्ल्ड ई-बुक लायब्ररी, रिमोट अॅक्सेस आदी प्रणालींबरोबरच पुस्तकांना बारकोडिंग व मॅग्नेटिक टायटल टेप बसविण्यात आले आहेत.प्रश्न : ग्रंथालयातील या संगणकीय प्रणालींचा वापर कशाप्रकारे होतो?उत्तर : स्मार्ट कार्डशिवाय ग्रंथालयात कोणालाही प्रवेश मिळत नाही की कोणालाही पुस्तके मिळत नाहीत. सभासद विद्यार्थी- प्राध्यापकांना ग्रंथालयामार्फत स्मार्ट कार्ड दिले जाते. त्यात संबंधिताची सर्व माहिती असते. मॅग्नेटिक टायटल टेप व सेन्सॉर गेट यामुळे ग्रंथालयातील पुस्तक व्यवहारावर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे. पुस्तके स्वॅप न करता ती परस्पर घेऊन जाता येत नाहीत. कोणी तसा प्रयत्न केलाच तर गेटचा बझर वाजतो. पुस्तकांच्या गणनेचे काम सोपे व्हावे, यासाठी बारकोडिंग पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व पुस्तकांना मॅग्नेटिक टायटल टेप लावण्यात आले आहेत. सोल स्वॉफ्टवेअरमध्ये ग्रंथालयातील सर्व पुस्तकांचा डेटाबेस आहे. ग्रंथालयातील इंटरनेट लॅबमध्ये विद्यार्थी काय अॅक्सेस करतो, याची संपूर्ण माहिती वेब कॅफे मॅनेजमेंटच्या माध्यमातून मिळते. प्रश्न : विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी व प्राध्यापक हे या सर्व अत्याधुनिक प्रणालींचा वापर दैनंदिनपणे करतात, का?उत्तर : ग्रंथालयातील इंटरनेट लॅबमध्ये सन २००८ मध्ये १२ हजार संशोधन पेपर डाऊनलोड करण्यात आले होते. आता त्यामध्ये १३ पटींनी वाढ झाली आहे. मागील वर्षामध्ये १ लाख ९५ हजार संशोधनात्मक पेपर डाऊनलोड केल्याची आकडेवारी आहे. विद्यापीठात संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना केवळ १०० रुपये एवढ्या अल्पदरात वर्षभरासाठी ‘रिमोट अॅक्सेस’चा आयडी व पासवर्ड दिला जातो. या प्रणालीच्या माध्यमातून ३० लाख ई- बुक कुठेही बसल्या जागी त्यांना अभ्यासता येतात. प्रश्न : दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटलायझेशनचे काम कुठपर्यंत आले?उत्तर : डिजिटलायझेशन झालेले नाही. ग्रंथालयातील ४ हजार दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटलायझेशन राहिले आहे. हा दुर्मिळ दस्तावेज बाहेर दिला जात नाही. डिजिटलायझेशनसाठी ५० ते ६० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. विद्यमान कुलगुरू डॉ. चोपडे हे त्यासाठी इच्छुक आहेत. यूजीसीकडून बजेट मिळाल्यानंतर लगेच ते केले जाईल. ग्रंथालयाने दैनंदिन व्यवहारामध्ये माहिती व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अमूलाग्र बदल घडविला आहे.आणला असून हे ग्रंथालय देशातील अन्य विद्यापीठांसाठी दिशादर्शक ठरले आहे.
विद्यापीठात साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ग्रंथालय
By admin | Updated: November 7, 2014 00:53 IST