---
दोन स्वतंत्र लिंक : शाळा, विद्यार्थ्यांची मते घेणार जाणून, ९ मेपर्यंत लिंक असणार सुरू
---
औरंगाबाद : दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत राज्य मंडळाशी संलग्नित शाळांमधील शाळा स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करावे का त्यासाठी शाळा सक्षम आणि तयार आहेत का यासंबंधीची मते ऑनलाइन लिंक सर्व्हेच्या माध्यमातून ९ मे पूर्वी शाळांकडून जाणून घेण्यात येणार आहे. तर अकरावीत प्रवेशासाठी स्वतंत्र सीईटी घेण्यात यावी काय यासंबंधीची दहावीतील बोर्डाच्या विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी अभिप्राय लिंक शिक्षण संचालकांकडून प्राप्त झाली असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा विभागीय परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव डॉ. बी. बी. चव्हाण यांनी दिली.
शिक्षण विभागाने शाळा आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दोन लिंक दिलेल्या असून त्या ९ मे पूर्वी ऑनलाइन भरायच्या आहेत. दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाबाबत राज्य मंडळाशी संलग्नित शाळांमधील विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करावे काय? यासाठी शाळा सक्षम व तयार आहेत काय? हे जाणून घेण्यासाठी सदर सर्वेक्षण करण्यात येत आहे. ही सर्व्हे लिंक राज्यातील सर्व इयत्ता १० वीचा वर्ग असणाऱ्या शासकीय, शासकीय अनुदानित, विनानुदानित, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांकडून भरून घेण्याची सूचना शिक्षण विभागाने केली आहे.
ज्या शाळांनी, शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग घेतले आहे, ऑनलाइन चाचण्या घेतल्या आहेत, व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून वर्ग अथवा चाचणी घेतले आहे या सर्व बाबींचा समावेश करून अंतर्गत मूल्यमापन करता येईल. तसेच काही शाळांनी १-२ सहामाही परीक्षा किंवा बोर्ड सराव परीक्षा घेतल्या असतील याचाही समावेश करून काही प्रमाणात विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करता येईल. इतर शाळांना कदाचित ९ वी च्या परीक्षेच्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करता येईल. ज्या ठिकाणी या पैकी कोणत्याही चाचण्या, परीक्षा झालेल्या नाहीत त्या ठिकाणी अंतर्गत मूल्यमापन करणे कठीण जाईल. सदरचा सर्व्हे हा केवळ राज्य मंडळाशी संलग्नित शाळांनीच भरावा. या सर्व्हेच्या माध्यमातून अचूक व स्पष्ट मत ९ मे पूर्वी नोंदविण्यात यावे, असे शिक्षण विभागाने म्हटले आहे.
---
अकरावी प्रवेशासाठीच्या परीक्षेबाबत अभिप्राय लिंक
---
कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द केलेल्या आहेत, इयत्ता अकरावीच्या वर्गात प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय? ही परीक्षा राज्यातील सर्व इच्छुक इयत्ता दहावीचे विद्यार्थी देऊ शकतील. परीक्षेचे स्वरूप हे साधारणत: ओएमआर पद्धतीनुसार असावी, सर्व विषयांचा मिळून एकत्रित एक पेपर असावा, पेपरसाठी २ तासांचा वेळ देण्यात यावा. परीक्षा साधारणत: जुलै महिन्यामध्ये किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर प्रत्येक शाळेच्या ठिकाणी घेण्यात यावी असे विचारात आहे. कोरोनाविषयक सुरक्षेचे सर्व नियमांचे पालन करून या परीक्षेच्या गुणांच्या आधारावर इच्छुक विद्यार्थ्यांना गुणात्मक तत्त्वावर ११ वीमध्ये प्रवेश देता येईल. राज्यातील सर्व अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे १०० गुणांची ऑफलाइन (प्रत्यक्ष) प्रवेश चाचणी घेणे प्रस्तावित असून त्याबद्दल सर्व्हे लिंकमध्ये आपले स्पष्ट मत नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.