कळंब : खरीप हंगामाखालील लागवड क्षेत्र जास्त असलेल्या कळंब तालुक्यातील शेतकर्यांची खरीपपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली असून, आगामी हंगामात याहीवर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. सोयाबीनच्या बियाण्याची बाजारात कमतरता जाणवण्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे शेतकर्यांनी पेरावे, यासाठी कृषी विभागाने आवाहन केले आहे. कळंब तालुक्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्र १ लाख हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये सर्वाधिक पेरा खरिपाचा असून, तालुक्यातील खरीप सर्वसाधारण क्षेत्र ७४५४० हेक्टर एवढे आहे. तालुक्यातील जवळपास ७८ गावामध्ये खरिपाची मोठी पेर होत असून, उर्वरित २१ गावांतही अलीकडील काळात खरिपाखालील पेरणीक्षेत्रात वाढ झालेली दिसून येत आहे. तालुक्यातील मागील दोन-चार वर्षात सोयाबीनच्या क्षेत्रात अनपेक्षित वाढ झाली आहे. गतवर्षी ३७ हजार हेक्टर एवढ्या विक्रमी क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला होता. पूर्वी फक्त तेरणा काठावरच्या सातेफळ, दहिफळ, शेलगाव (दि), सापनाई, गौर व शिराढोण भागात सोयाबीनचे पीक घेतले जायचे. परंतु आता तालुक्यातील सर्वच महसूल मंडळातील गावात उत्पादनास साथ मिळत असल्याने हमीभाव असल्याने सोयाबीनचा नगदी पिकात समावेश होत असल्याने व दर टिकून राहत असल्याने सोयाबीनचा पेरा होत आहे. यावर्षी सोयाबीनचा जवळपास ४२ हजार हेक्टरवर पेरा होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. (वार्ताहर) सोयाबीन बियाण्याचा तुटवडा ? गतवर्षी बाजारात शेवटच्या टप्प्यात सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवला होता. कृषी विभागाने काढणी व मळणी पश्चात घेतलेला बिजोत्पादनाचा प्रयोग अनियमित निसर्गामुळे अपयशी ठरला आहे. यामुळे यावर्षी सोयाबीनच्या वाढत्या क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर बियाण्यांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे कृषी विभागाने तालुक्यात बियाण्याच्या तुटवड्यास दुजोरा दिला आहे. मशागतीची कामे अंतिम टप्प्यात तालुक्यातील सर्वच भागात खरीपपूर्व शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. उन्हाळ्यात शेती मोकळी झाल्यावर शेतकर्यांनी नांगरणी, वखरणी आदी कामे करुन घेतली आहेत. शेतात अलीकडील काळात बैलाद्वारे मशागत करण्याचे प्रमाण कमी झाले असून, नांगरणी, वखरणी यासाठी सर्रास ट्रॅक्टरचा उपयोग केला जात असल्याने शेतीची पेरणीपूर्व मशागतही चांगली होत आहे. शिवाय वेळही वाचत आहे. कापसाचे क्षेत्र घटणार कापसाला मिळणारा दर, शासकीय खरेदी केंद्रावरील मिळणारा बाजारापेक्षा कमीचा दर, बियाणे व खताच्या वाढलेल्या किंमती, मजुरांचा प्रश्न व वेचणीचा दर यामुळे कापसाचे पीक हे आतबट्ट्याचे ठरले आहे. कापसाचे नामांकित कंपन्याचे बियाणे वापरले तरी अपेक्षित चांगले उत्पन्न मिळत नाही. शिवाय बाजारात मिळणारा दर हा सतत चढउताराचा असतो. कापूस वेचणीसाठी शेतकर्याला प्रतिकिलो ५ रुपयापासून १० रुपयाप्रमाणे वेचणी द्यावी लागत आहे. यामुळे यावर्षी बहुतांश शेतकरी कापसाऐवजी सोयाबीन करण्याचे बोलून दाखवत आहेत. घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन बियाण्याच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने विविध ठिकाणी बैठका घेऊन प्रात्यक्षिक दाखवून घरचे बियाणे वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी कृषी विभागाने ज्यांच्याकडे सोयाबीन उपलब्ध आहे. यासाठी संपर्क नंबर व साठ्यासह नोंद घेण्यास सुरुवात केली आहे. कृषी विभागाने याकामी प्रसिद्धी व प्रचार करण्यासाठी विविध पथके निर्माण केली आहेत. आगामी खरीप हंगामात तालुक्यात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता असून, बियाण्याच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी घरच्या बियाण्याची उगवणक्षमता तपासून, बीजप्रक्रिया करुन बियाण्याची पेरणी करावी. फक्त बियाणे ३ ते ४ सें.मी. मीटरपेक्षा जास्त खोलीवर पेरु नये, असे कृषी अधिकारी एम. आर. मोरे यांनी सांगितले.
आंतरमशागत उरकली; आता प्रतीक्षा मान्सूनची
By admin | Updated: June 3, 2014 00:46 IST