औरंगाबाद: एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेलेल्या नागरीकांना मदतीच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुक करणा-या एका आंतरराज्यीय टोळीला ग्रामीण पोलिसांनी बुधवारी छत्तीसगडमधून अटक केली. या टोळीने देशभरातील विविध राज्यात शंभरहून अधिक गुन्हे केले असून त्यांनी या फसवणुकीतून ५० लाख रुपये हाडपल्याची माहिती समोर आली,अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुख्य आरोपी शैलेंद्रसिंग घिसाराम (४२,रा.सुलतानपुरी, दिल्ली), विनोदसिंग गजेंसिंग (२५),पालराम गंजेसिंग(३२,दोघे रा. लोहारी, हिस्सार, हरियाणा) आणि राजेश सतबिरसिंग (२५,रा. सुलेमाननगर, दिल्ली) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचे दोन साथीदार पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. डॉ. आरती म्हणाल्या की, विस्तार अधिकारी सुधाकर रंगनाथ म्हस्के (रा.औरंगाबाद) हे ८ सप्टेंबर रोजी वैजापुरमधील रेल्वेस्टेशन रोडवरील एका एटीएम सेंटरवर पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी अनोळखी माणसाने त्यांना पैसे काढण्यासाठी मदत करतो,असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. यावेळी आरोपीने त्यांचे एटीएम कार्ड घेतले आणि स्वॅब करून पैसे काढून दिले मात्र त्यांचे कार्ड त्यांना परत न करता ते बदलून दिले.तीन दिवसानंतर ते पुन्हा एटीएम वर पैसे काढण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्याकडील एटीएम कार्ड हे दुस-याच व्यक्तीचे असल्याचे समजले. अधिक चौकशीअंती त्यांच्या खात्यातून भामट्यांनी तब्बल ७७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचेही त्यांना कळले. त्यांनी याप्रकरणी तात्काळ वैजापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला.
याबाबत माहिती मिळताच ग्रामीण गुन्हेशाखा आणि सायबर क्राईम सेलने आरोपीचा शोध सुरू केला. तेव्हा आरोपी एटीएम सेंटरमधील सीसीटिव्हीत कैद झाल्याचे आढळले. आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील नव्हता. यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड होते. असे असताना सायबर क्राईम सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यांचे मोबाईल नंबर मिळविले. असता ते घटनेनंतर विविध राज्यात फिरत असल्याचे आढळले. शेवटी ही टोळी छत्तीसगड राज्याची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, उपनिरीक्षक सय्यद मोसीन,कर्मचारी रतन वारे, किरण गोरे, रविंद्र लोखंडे, सागर पाटील, योगेश तरमाळे, योगेश दारवंटे, गजानन बनसोड यांनी तेथे जाऊन बुधवारी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात विविध बँकांची एटीएम हस्तगत करण्यात आली.