औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील काही विभागांच्या इमारतींचे काम रेंगाळल्याच्या पार्श्वभूमीवर आणि त्यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी इमारतींची पाहणी केली. विद्यापीठातील मानसशास्त्र, संस्कृत, विधि या विभागांचे तसेच डिजीटल स्टुडिओचे काम मागील तीन ते चार वर्षांपासून रखडले आहे. यासंबंधी लोकमतने वृत्त प्रसिद्ध के ल्यानंतरही विद्यापीठ प्रशासनाला जाग आली नाही. मात्र, बांधकाम विभागात काम रखडल्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर अपूर्ण राहिलेल्या इमारतींची अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान, विद्यापीठाने ७ आॅगस्ट रोजी बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रात बांधकाम विभागाकडून काम काढून घेण्यासंबंधी स्पष्ट विनंतीवजा सूचना केली आहे. या पत्रात विद्यापीठाच्या इमारत आणि बांधकाम समितीने काम काढून घेण्यासंबंधी २९ जुलै रोजीच्या बैठकीत ठराव घेतल्याचे सांगण्यात आले असून, पत्रासोबत ठराव जोडला आहे. या ठरावात म्हटले आहे की, विद्यापीठ परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या विविध बांधकामांच्या संदर्भात मा. व्यवस्थापन परिषदेने स्थापन केलेल्या समितीचा अहवाल स्वीकारण्यात येत आहे. सदर अहवालात नमूद केल्याप्रमाणे विद्यापीठ परिसरातील बांधकाम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काढून घेण्यात यावे व तसे सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात यावे. समितीच्या ठरावाची प्रत विद्यापीठाने बांधकाम विभागाला पाठविल्यानंतर बांधकाम विभागाने एका कंत्राटदाराला काम थांबविण्याची नोटीस जारी केली आहे. मात्र, कंत्राट थांबविण्याचे नेमके कारण काय, याचा उल्लेख बांधकाम विभागाने कंत्राटदाराला केलेला नाही. त्याचप्रमाणे विद्यापीठानेदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कामे का काढून घेण्यात येत आहेत, याचे सबळ कारण दिलेले नाही. बांधकामाचा दर्जा बरोबर नाही, बांधकाम होण्यास विलंब झाला किंवा अन्य काही तांत्रिक कारण आहे, याचा विद्यापीठाच्या पत्रात कुठेही उल्लेख नाही.
सा.बां.कडून विद्यापीठातील इमारतींची पाहणी
By admin | Updated: December 17, 2015 00:12 IST