सुनील कच्छवे , औरंगाबाददुष्काळ निवारणाच्या उपाययोजनेंतर्गत मराठवाड्यात कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधाच्या कामांच्या गुणवत्तेची विशेष पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. विभागातील चार जिल्ह्यांतील कामांची तपासणी करण्यासाठी शासनाने दोन पथके स्थापन केली आहेत. ही पथके चार दिवसांपासून गावोगावी जाऊन सिमेंट नालाबांधांची तपासणी करीत आहेत. आठवडाभरात तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल जलसंधारण खात्याला सादर करण्यात येणार आहे.मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांना सातत्याने दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दुष्काळ निवारणाचा कायमस्वरूपी उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यात गेल्या तीन वर्षांत ठिकठिकाणी सिमेंट नालाबांध बांधण्यात आले. त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. जलसंधारणाची ही कामे लघु पाटबंधारे आणि कृषी विभागामार्फत करण्यात आली. मात्र, यातील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या तक्रारी सरकारकडे करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्या तीन वर्षांत झालेल्या सिमेंट नालाबांधांच्या कामांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मराठवाड्यात रोहयोचे उपायुक्त डॉ. अनिल रामोड आणि विकास शाखेचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके स्थापन केली आहेत. प्रत्येक पथकात एक उपअभियंता, एक लेखाधिकारी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता, जिल्हा कृषी अधीक्षक, तालुका कृषी अधिकारी, तसेच पुणे येथील कृषी आयुक्तालयातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सिमेंट नालाबांधांची सर्वाधिक कामे झाली आहेत. त्यामुळे या चार जिल्ह्यांतील कामांची तपासणी करण्यात येत आहे. डॉ. अनिल रामोड यांचे पथक उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांतील तर सुरेश बेदमुथा यांचे पथक औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांतील सिमेंट नालाबांधाच्या कामांची तपासणी करीत आहे. प्रत्येक तालुक्यातील ५ टक्के कामांची तपासणी केली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून ही तपासणी सुरू असून, उर्वरित तपासणीचे काम आणखी आठवडाभरात पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आठवड्यात अहवालमराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांत सिमेंट नालाबांधांची दोनशे कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कामे झालेली आहेत. सर्वाधिक कामे झालेल्या चार जिल्ह्यांतील कामांची तपासणी सध्या केली जात आहे. ही तपासणी येत्या आठवड्यात पूर्ण होणार असून, त्यानंतर लगेचच जलसंधारण खात्याला याचा अहवाल सादर केला जाणार आहे.सिमेंट नालाबांधांसाठी निवडलेली जागा (साईट), कॅचमेंट एरिया, नालाबांधासाठी वापरलेल्या सिमेंट काँक्रीटचा दर्जा, नालाबांधातील गळती आदी बाबींची पथकांकडून तपासणी केली जात आहे. या भेटीदरम्यान पथकांकडून शेतकऱ्यांचे जबाबही नोंदवून घेतले जात आहेत.
पथकांकडून तपासणी
By admin | Updated: July 20, 2014 00:59 IST