जालना : नगर पालिकेत गत पाच वर्षांत झालेल्या विविध कामांची तसेच त्यातून झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी पूर्ण झाली असून, सोमवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. ही चौकशी १४ मुद्यांवर करण्यात आली असून, संबंधित सर्वच विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन अधिकारी उमेश कोठीकर तसेच मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी ही चौकशी पूर्ण केली. हा अहवाल शुक्रवारी जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांना सादर करण्यात येणार होता. मात्र काही विभागांकडून माहिती न मिळाल्याने हा अहवाल आता सोमवारी सादर करण्यात येणार आहे. शनिवारी व रविवारी दोन दिवस पूर्ण अहवाल तयार करण्यात आला आहे. शेकडो पानांचा हा अहवाल असल्याचे सूत्रांनी सांगितले. विधिमंडळ अंदाज समितीने जालना नगर पालिकेतील कारभारावर ठपका ठेवत १४ मुद्यांवर सखोल चौकशी प्रस्तावित केली. त्या अनुषंगाने वीस दिवसांत ही चौकशी पूर्ण झाली आहे. पालिकेतील बांधकाम, मालमत्ता कर, पाणीपुरवठा हे विभाग हिटलिस्टवर आहेत. त्यासोबतच इतर विभागांतील गैरव्यवहार व अनागोंदी समोर येणार आहे. सूत्रांच्या म्हणण्यानुसार अनेक गैरप्रकार यात झाले आहेत. लवकरच सर्व सत्यता समोर येईल, असे सांगण्यात आले. मात्र बांधकाम, मालमत्ता कर आणि पाणीपुरवठा तसेच विद्युत विभागात अनागोंदी झाली असून, ही चौकशीही कमी पडेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पालिकेने २०११ ते १६ या पाच वर्षांत अनेक त्रुटी व आर्थिक अनियमितता झाल्याचे विधिमंडळ अंदाज समितीच्या चौकशीत उघडकीस आले होते. त्यानंतर पालिकेतील विभागनिहाय चौकशी झाली. पालिकेतील संपूर्ण आर्थिक व्यवहार चौकशीत तपासण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
चौकशी अहवाल आज होणार सादर
By admin | Updated: July 18, 2016 01:02 IST