उस्मानाबाद : उमरगा येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहातील अडचणींकडे कानाडोळा करणाऱ्या गृहपालास समाज कल्याण अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर आता २०११-१२ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील सर्व अभिलेख्याची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. उमरगा येथे ८० विद्यार्थिंनीसाठी हे शासकीय वसतिगृह आहे. किरायाच्या इमारतीत असलेल्या या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थिनींना गेल्या काही दिवसांपासून अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात आ. ज्ञानराज चौगुले यांनी ९ फेब्रुवारी रोजी या वसतिगृहाला भेट दिल्यानंतर मुलींनी त्यांच्यासमोर तक्रारींचा पाढा वाचला. या वसतिगृहाचे अधीक्षक हे नेहमीच गैरहजर असतात. या वसतिगृहात विद्यार्थिनींना राहण्यासाठी जागा अत्यंत अपुरी असून, त्यांना विविध गैरसोर्इंचा सामना करावा लागतो. शाासनाने ठरवून दिल्याप्रमाणे दैनंदिन जेवणसुद्धा हे पुरेसे मिळत नसल्याची तक्रार यावेळी विद्यार्थिनींनी आ. चौगुले यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांंसमोर मांडली होती. त्यानंतर समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांनी उमरगा येथील गृहपालास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आता या वसतिगृहातील २०११-१२ व २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातील सर्व अभिलेख्याची पडताळणी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. समितीने वसतिगृहातील सर्व प्रवेशित मुलींची सखोल चौकशी करुन दहा दिवसामध्ये वस्तुनिष्ठ चौकशी अहवाल दाखल करण्याचे आदेश बुधवारी देण्यात आले. या चौकशी समितीमध्ये विशेष अधिकारी ए.एम. घवले, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक अ.ना. गोडबोले, समाज कल्याण निरीक्षक डी.जी. घोरपडे, व्ही.एस. जगताप, पी.एच. पवार यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
वसतिगृह अभिलेख्यांची समितीमार्फत चौकशी
By admin | Updated: February 19, 2015 00:44 IST