जालना : शेतकऱ्यांना आधुनिकयुक्त तंत्रज्ञानाने शेती करता यावी, यासाठी जिल्हा परिषदेकडून शेतकऱ्यांना अनुदान स्वरुपात नावीन्यपूर्ण औजारे देण्यात येणार आहेत. यासाठी ५० टक्के अनुदानाऐवजी ७५ टक्के अनुदान करण्याचा विचार सुरु आहे. गत काही वर्षांपासून दुष्काळामुळे शेतीची वाताहत होत आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी, यासाठी जिल्हा परिषद प्रायोगिक तत्वावर नवीन मशिनरी खरेदी करणार आहे. यात प्रामुख्याने वृक्ष लागवडीसाठी होल डीगर, जमिनीतील सेंद्रीय पदार्थ वाढविण्यासाठी तसेच कापसाचा भूगा करणारी मशिन, कापूस वेचणीची मशिन खरेदी करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर होल डीगर, कॉटन श्रेडर, सिताफळाचा गर काढण्याचे यंत्र, स्लरी ट्रॅँक, ट्रॅक्टरवरील डायनोमा या योजना ५० टक्के अनुदानाऐवजी ७५ टक्के अनुदान तत्वावर करण्याची गरज आहे. यामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यास लवकर मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. नवीन औजारांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेच्या बचतीसोबत पैशांची बचत होणार आहे. आज रोजी मजुरांअभावी कापूस वेचणी जिकीरीची बनली आहे. कापूस वेचणी यंत्रणामुळे वेचणी सुलभ होईल, पैसाही जास्त द्यावा लागणार नाही. त्याचबरोबर विविध वृक्ष लागवडीसाठी होल डिगर हे अत्यंत प्रभावी यंत्र शेतकऱ्यांना मिळणार असून त्यामुळे मजूरांवरील खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होणार आहे. या यंत्रामुळे वृक्ष लागवड सुलभ व नेटकी होणार असल्याने त्यांच्या फळ पिकांचे उत्पन्नही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पन्नास टक्के अनुदानावर कॉटन चिल्ड्रर व कॉटन अपरुटर या बाबी नवीन असल्याने त्या ५० टक्के ऐवजी ७५ टक्के या सुधारीत अनुदानाच्या दराने शेतकऱ्यांना पुरविण्यास तसेच कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ही नवीन औजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कृषी विकास अधिकारी कार्यालयामार्फत ही औजारे वाटप होणार आहेत.
नावीन्यपूर्ण औजारे देणार
By admin | Updated: December 19, 2015 23:42 IST