औरंगाबाद : ग्लोबलायझेशनच्या युगात उद्योगांमध्ये वाढलेली अफाट स्पर्धा, विविध करांचा वाढता बोजा, तसेच कच्च्या मालाचे दर आकाशाला गवसणी घालत असताना उद्योजकांचे जगणे अगोदरच असह्य झालेले असून भाजपा-शिवसेना युतीने दोन दिवसांपूर्वीच २० टक्के विजेची दरवाढ करून उद्योजकांना मोठा शॉक दिला. या निर्णयामुळे उद्योजक टिकणे आता अवघड होऊन बसले आहे. भविष्यात डीएमआयसी प्रकल्पावरही याचे दूरगामी परिणाम जाणवतील.वीज दरवाढीच्या या निर्णयामुळे मराठवाड्यातील उद्योग क्षेत्राचे कंबरडेच मोडणार असून, प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दरवाढीमुळे अनेक उद्योग इतर राज्यांत स्थलांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मराठवाड्यासारख्या मागास भागात बहुचर्चित डीएमआयसी प्रकल्प अक्षरश: खेचून आणण्यात आला. नवीन उद्योग सुरू करण्यास बहुराष्ट्रीय कंपन्या महाराष्ट्रात अजिबात सरसावणार नाहीत. २००८ मध्ये विजेचे दर युनिटमागे ४ रुपये ४५ पैसे होते. आज उद्योगांना तब्बल ९ रुपये युनिटने वीज घ्यावी लागते. त्यात २० टक्के दरवाढ होणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून होईल. जानेवारीत, वाढीव दराने वीज बिल हाती पडेल.
उद्योग टिकणे अवघड!
By admin | Updated: December 7, 2014 00:19 IST