नांदेड : महसूल कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी स्वतंत्र महसूल केंद्राची उभारणी नांदेडात करण्यात येणार आहे़ राज्यातील हा पहिला प्रयोग ठरणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले़महसूल कर्मचाऱ्यांच्या कामाची गती वाढविण्यासाठी वेगवेगळ्या प्रशिक्षणाची गरज असते़ राज्यात केवळ पैठण, औरंगाबाद आणि नाशिक येथे महसूल कर्मचारी प्रशिक्षण केंद्र आहेत़ या ठिकाणी प्रशिक्षणासाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांची हजेरी असते़ त्यात जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना कधी संधी मिळेल याबाबत खात्री नसते़ त्यामुळे नवीन निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची गरज असते़ जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात अप्पर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी ८ वेगवेगळे प्रशिक्षण शिबीरे घेतली़ ही बाब लक्षात घेवून जिल्ह्यातच कायमस्वरूपी महसूल प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला अन् त्याची अंमलबजावणीही तत्काळ करण्यात आली़ या महसूल प्रशिक्षण केंद्रातील सोयी सुविधांसाठी नियोजन समितीकडून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत १० लाख रूपये आणि जिल्हा सेतू समितीकडून १० लाख असा २० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ या केंद्राचे स्वातंत्रदिनी पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे़ यशदाचे उपकेंद्र नांदेडला मंजूर झाले होते़ मात्र राज्य शासनाने या केंद्रासाठी निधीच उपलब्ध करून दिला नसल्याने हे केंद्र बारगळल्यातच जमा आहे़ परिणामी यशदाच्या धरतीवरच उभारण्यात येणाऱ्या या महसूल प्रशिक्षण केंद्राला महत्व प्राप्त झाले आहे़ या केंद्रात तलाठी, लिपीक, अव्वल कारकून, नायब तहसीलदार आदींना प्रशिक्षण दिले जाईल़ यासाठी ३ तज्ज्ञांची मानधन तत्वावर नेमणूक केली जाईल़ जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन इमारतीत हे प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित होणार असून येथे ३० विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व १० संगणक एकाचवेळी उपलब्ध राहणार आहेत़ (प्रतिनिधी)
नांदेडला स्वतंत्र महसूल प्रशिक्षण केंद्र
By admin | Updated: August 14, 2014 02:09 IST