औसा : तालुक्यात यावर्षी ८५ ते ९० हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या़ आहेत़यातील ५० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असून बहुतांशी क्षेत्रावरील सोयाबीनची उगवणच झाली नाही़ सोयाबीनसह अन्य जी पिके उगवली आहेत़ त्यामध्ये रिमझिम पाऊसामुळे बारीक तण वाढले आहे़ हे तण काढण्यासाठी रोजंदारीवर जास्त खर्च होतो म्हणून शेतकरी तणनाशक औषधे वापरावर भर देत आहे़तालुक्यात खरीप हंगामाचे क्षेत्र मोठे आहे़ पाऊस पडला की सर्व शेतकऱ्यांची पेरणीसाठी घाई सुरु होते़ पेरणीनंतर पिकांतील खुरपणीस सुरुवात होते़ सर्व शेतकऱ्यांची एकाच वेळी धावपळ असल्याने खुरपणीसाठी मजूर महिलांची कमतरता भासते़ त्यामुळे आपोआपच मजुरीचे दर ही वाढतात़ मागील दोन-तीन वर्षांपासून विविध पिकांमध्ये फवारणीसाठी वेगवेगळ्या प्रकाराची तणनाशके बाजारात आली आहेत़ मजुर टंचाईवर उपाययोजना म्हणून आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर सुरू केला आहे़सध्या शेतकरी सोयाबीन पिकावर मुख्य लक्ष केंद्रीत करून आहे़ सुरूवातीला ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या ते शेतकरी सोयाबीनची कोळपणी करून तणनाशक फवारणी करीत आहे़ बाजारात १ हजार ५०० रूपयांपासून ते २ हजार २०० रूपये लिटरपर्यंत तणनाशक औषधे उपलब्ध आहेत़ एक लिटर तणनाशकामध्ये साधारण तीन ते साडेतीन एकर क्षेत्राची फवारणी होते़ मजुरावर खुरपणी करायचे म्हटले तीन एकर क्षेत्राला साधारण ६ ते ७ हजार रूपये खर्च होतो़ वेळ आणि पैशाची बचत म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणात तणनाशकाचा वापर करीत आहे़(वार्ताहर)शेतकऱ्यांनी तणनाशकाचा वापर काळजीपूर्वक करावा़ कृषी सेवा केंद्रांनी सांगितल्याप्रमाणेच औषधांचा वापर करावा़ फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये़ बाजारात सध्या बोगस तणनाशकांची चर्चा असून त्यापासून सावध रहावे, असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतिष शिंदे यांनी सांगितले़
शेतीत तणनाशकांचा वापर वाढला
By admin | Updated: August 1, 2014 00:25 IST