बीड : २०११ मध्ये नगरपरिषद क्षेत्राचा विस्तार झाला. हद्दवाढीमुळे पालिकेशी जोडल्या गेलेल्या शहरानजीकच्या रहिवाशांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र, तीन वर्षानंतरही या वस्त्यांपर्यंत नागरी सुविधा पोहोचल्याच नाही. इतकेच काय;पण; वीज, पथदिवे, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांसाठीचा संघर्ष अजून संपलेला नाही.शहराची हद्द वाढली;पण तुलनेने विकास झाला नाही. त्यामुळे पालिकेने असुविधांची ‘हद्द’ केली, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. हद्दवाढीतील भागांमध्ये गुरूवारी ‘लोकमत’ने स्पॉट रिपोर्टिंग केले़ त्याचाच हा आढावा़आमच्याकडून सर्व सोयीसुविधा पुरविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत़ रस्ते, नाल्या, वीज, पाणी या नागरी सुविधांना अधिक प्राधान्य देत आहोत़ नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आम्ही टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे़ यावर संपर्क साधून आपल्या तक्रारींची दखल घेत मार्गी लावण्या येतील़- श्रीकृष्ण भालसिंग, मुख्याधिकारीशहरातील चक्रधरनगर हा भाग समस्यांच्या चक्रव्यूहात अडकलेला आहे. वीज, नाल्या, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधांचाची येथे वाणवा आहे. नाल्या तर नाहीतच. प्रत्येकाच्या घरापुढे पाण्याचे डोह साचले आहेत. विद्युत तारा लोंबकळलेल्या आहेत. रस्ते धड नसल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांचे हाल होत आहेत. सिमेंट रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रस्ते चिखलमय होतात़ उपाययोजना होत नाहीत़ तक्रारींची दखल घेतली जात नाही, असा पाढा रहिवाशांनी वाचला़नरसोबानगराला घाणीचा विळखा; आरोग्य धोक्यातनरसोबानगरात कचरा टाकण्यासाठी कुंडीच नाही. नागरिक उघड्या भूखंडांवरच कचरा फेकून नागरिक मोकळे होतात. त्यामुळे डुकरांसह मोकाट गुरांचाही मुक्त संचार आहे. नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्या गरजेच्या आहेत;परंतु अद्याप नाल्याही झाल्या नाहीत. त्यामुळे ठिकठिकाणी डबके साचले आहेत. परिणामी डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे रोगराईला निमंत्रण मिळू लागले असून आरोग्य धोक्यात आहे़अंधारामुळे चोरांचा सुळसुळाटगयानगर, शिंदेनगर, गया इस्टेट परिसरात पथदिवे नाहीत. रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यांवरही अंधार असतो. त्यामुळे या भागात चोरांना मोकळे रान आहे. पथदिवे नसल्याने नागरिकांना रात्री-अपरात्री जीव मुठीत धरून जावे लागते. सायंकाळी सातनंतर महिला घराबाहेर पडत नाहीत. अंधाराचा फायदा घेऊन छेडछाडही होते. त्यामुळे पथदिव्यांचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची मागणी आहे. या भागातील रस्त्यांचीही अतिशय वाईट स्थिती आहे़ मोठमोठे खड्डे पडल्याने पायी चालणेही जिकरीचे बनले आहे़ त्यामुळे अनेकजण रस्ता बदलून जाणे पसंत करतात़एकनाथनगरात बाराही महिने पाण्याचा ठणठणाटएकनाथनगर भागात झपाट्याने वसाहत वाढत आहे. मात्र, या भागात अद्याप नळजोडण्या नाहीत. त्यामुळे बोअरच्या क्षीरयुक्त पाण्यावरच बाराही महिने तहान भागवावी लागते. नळपट्टी मात्र न चुकता वसूल केली जाते. नळाचे पाणीच नाही तर नळपट्टी का द्यायची? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भागांत नाल्या कुठे झाल्या तर कुठे नाही. त्यामुळे रहिवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागते. राजीव गांधी चौकापासून जोडलेल्या रस्त्याचे काम झाले;पण दोन्ही बाजूच्या पट्ट्यांचे काम रखडलेलेच आहे.
असुविधांची ‘हद्द’वाढ !
By admin | Updated: January 23, 2015 00:56 IST