लातूर : काळ वेगाने धावतो आहे. त्यामुळे आपण काळाची पावले ओळखून त्याच्या आधी आपली शिक्षणाची दिशा बदलली पाहीजे, असे आवाहन शुक्रवारी ‘अस्पायर लोकमत एज्युकेशन फेअर’च्या उद्घाटन प्रसंगी केले. टाऊन हॉलच्या मैदानावर उभारलेल्या भव्य मंडपात शिक्षणप्रेमींसमोर ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन शर्मा आणि पोलिस अधिक्षक बी. जी. गायकर, लोकमतच्या सोलापूर आवृत्तीचे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, या प्रदर्शनाचे सहप्रायोजक डी.बी. ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे दिनेश बेंबडे आणि राजीव गांधी पॉलिटेक्निकचे शिवलिंग जेवळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी माजी कुलगुरु आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे, जिल्हाधिकारी डॉ. शर्मा आणि पोलिस अधीक्षक गायकर या त्रिमूर्र्तींच्या हस्ते या फेअरचे थाटात उद्घाटन झाले. या प्रदर्शनात ३० शैक्षणिक संस्थांनी आपले स्टॉल मांडले आहेत. दहावी-बारावीचे निकाल आणि प्रवेशाची धावपळ ओळखून लातुरातील विद्यार्थ्यांसाठी एकाच मांडवाखाली शिक्षणाच्या संधी आणि मार्गदर्शनासाठी चर्चासत्रे घेऊन ‘लोकमत’ने प्रदर्शनाचे निमित्ताने लातुरकरांसमोर आणले आहे. याला पहिल्याच दिवशी दीड हजार प्रेक्षकांनी भेट देऊन विक्रम केला. पोलिस अधिक्षक बी. जी. गायकर म्हणाले की , अशी प्रदर्शने पुण्या-मुंबईलाच भरायची. आता लातूरसारख्या शैक्षणिक हब झालेल्या मराठवाड्यातील गावातही असे प्रदर्शन भरवून ‘लोकमत’ने जनतेला बातम्यांबरोबर संधीचा मार्गही दाखविल्याचे सांगितले. प्रारंभी जिल्हा प्रतिनिधी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. संतोष झुंजे यांनी सूत्रसंचालन केले तर शाखा व्यवस्थापक नितीन खोत यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)डोळसपणे कोर्सेस निवडावेत : डॉ. वाघमारे यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. जर्नादन वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना डोळसपणे कोर्सेस निवडण्याचे आवाहन केले. आम्ही कॉलेजला असताना काय, कुठे आणि कसे शिकायचे ? याची उत्तरे मिळायची नाहीत. आता अशी प्रदर्शने ज्याला ‘लोकमत’ने फेअर म्हंटले. ही खऱ्या अर्थाने शैक्षणिक जत्रा आहे. जॉर्जियासारखे विद्यापीठ नोकरीची हमी घेऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देते. कोठारी आयोगाने म्हंटले होते भारताचे शिक्षण पाच वर्षे मागे आहे. व्यवस्थेपासून पाठ्यपुस्तकांपर्यंत त्यात आमुलाग्र बदलाची गरज आहे. कारण माणसाच्या आयुष्यात टर्निंग पॉर्इंट हे शिक्षणाभोवतीच फिरत असतात. दहावी बारावी आणि पदवी हेच तर आयुष्याचे टर्निंग पॉर्इंट आहेत. यात यश मिळवायचे असेल तर कोर्सेस निवडताना काळजी आवश्यक असते. ही नस ‘लोकमत’ने ओळखूनच हा कार्यक्रम ठेवला ही बाब अभिनंदनीय असल्याचेही ते म्हणाले. सहा लोकांनी जिंकली चांदीची नाणी... या प्रदर्शनाला भेट दिलेल्या सहा लोकांनी ‘लकी ड्रॉ’तून चांदीची नाणी जिंकली. भेट दिलेल्या प्रेक्षकांनीच सायंकाळी चिठ्ठ्या उचलून त्यातून विजेते निवडण्यात आले. डी. एम. नरहरे, चेतन खताळ, मोनिका सातपुते, अभिजित सावंत आणि करिष्मा गिरी हे ते भाग्यवान विजेते होत. रविवारपर्यंत प्रदर्शन खुले...आज उद्घाटन झालेले ‘लोकमत’चे एस्पायर एज्युकेशनल फेअर रविवारपर्यंत लातूर जिल्ह्यातील इच्छुकांसाठी स.१० ते रा. ८ पर्यंत खुले राहणार आहे. यात राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांची ३० दालने उपलब्ध आहेत. याशिवाय, दररोज सायंकाळी असणारे मार्र्गदर्शनपर सेमिनार हे विद्यार्थ्यांचे खास आकर्षण असणार आहे.
एस्पायर लोकमत एज्युकेशन फेअरचे थाटात उद्घाटन
By admin | Updated: June 7, 2014 00:22 IST