औरंगाबाद : घाटीत रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरुन सलाईनची बाटली आणावी लागत असल्याच्या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी ४ हजार सलाईन बाटल्या वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे यांच्याकडे सुपूर्द केले.
खासदार जलील यांनी यावेळी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स, औषधशास्त्र आणि पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि वैद्यकीय साहित्यांची उपलब्धता व पुरवठा याबाबत माहिती घेऊन सूचना दिल्या. रुग्णालयात अत्यावश्यक असणारी औषधे व इतर वैद्यकीय साहित्याची कमतरता झाल्यास त्वरित कळवावे, जेणेकरुन योग्य तो पाठपुरावा करुन औषधे व वैद्यकीय साहित्य त्वरित उपलब्ध करुन देता येईल, असे खासदार जलील म्हणाले. यावेळी डॉ. माधुरी कुलकर्णी, डॉ. अब्दुल राफे, डॉ. मुक्तदीर अन्सारी तसेच शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते.
फोटो ओळ....
घाटी रुग्णालयाला ४ हजार सलाईन बाटल्या खासदार इम्तियाज जलील यांनी सुपूर्द केल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सुरेश हरबडे, डॉ. माधुरी कुलकर्णी, आदी उपस्थित होते.