बीड : जिल्हा परिषदेचा ‘रिमोट’ हाती ठेवून कारभार करण्यासाठी राष्ट्रवादीतील ‘सिनीअर’ नेत्यांमध्येही मोठी स्पर्धा आहे. सवते सुभे जपताना अस्तित्व, प्रतिष्ठेसाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजीला आणखीच धार येत असून राष्ट्रवादीतील टोकाची रस्सीखेच भाजपाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या खेळामागे पदाधिकाऱ्यांचे वेगवेगळे ‘इंटरेस्ट’ दडल्याची माहिती पुढे येत आहे.जिल्हा परिषदेची सत्ता काबिज केल्यावर राष्ट्रवादीत अध्यक्षपदावरुन चुरस होती. ज्या गटाचे सर्वाधिक सदस्य त्या गटाचा अध्यक्ष असा सरळसाधा नियम लावण्यात आला. माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्याकडे सर्वाधिक सहा सदस्य होते. त्यामुळे ‘लाल दिव्या’चा मान धस गटाला मिळाला होता. अडीच वर्षानंतर विधानसभा निवडणुका लागल्या अन् गेवराईत दोन पंडितांमधील वैर संपुष्टात आणून शरद पवार यांनी बेरजेचे राजकारण केले. बदामरावांना विधानसभेची अन् जि.प.अध्यक्षपदासाठी विजयसिंहांना उमेदवारी देण्याचा छुपा ‘करार’ झाल्याची चर्चाही तेंव्हा रंगली होती. दरम्यान, पंडितांच्या एकीचे ‘रिअॅक्शन’ झाल्याने बदामरावांना मोठ्या पराभावाला सामोरे जावे लागले. इकडे जिल्हा परिषदेत मात्र विजयसिंहांची जादू चालली. अमरसिंह पंडित आधीच विधानपरिषदेत पोहोचलेले होते तर त्यांचे छोटे बंधु विजयसिंह जिल्हा परिषदेचे कारभारी झाले. बदामराव पंडित यांचे पुत्र युद्धजीत पंडित यांना पुन्हा जि.प. सभापतीपदाची संधीही दिली नाही.बदामराव पंडित ‘बॅकफूट’वर गेल्याने त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर कायम आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंसोबत आ.अमरसिंह पंडित यांची जवळीक वाढलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील काही नेते अस्वस्थ आहेत. शिवाय आ. पंडित हे भाजपाच्याही निशाण्यावर आहेत. (प्रतिनिधी)जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्यावर अविश्वास ठराव आणून पंडित घराण्यांचे पंख छाटण्यासाठी राष्ट्रवादीतील काही पदाधिकारी पुढे येत असतील तर भाजपानेही त्यांना बळ देण्याचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे तूर्त विजयसिंहांपुढील अडचणी वाढल्या असून स्वकियांसोबतच विरोधकांचे वार झेलण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. या आव्हानाला ते कसे सामोरे जातात? हे कळेलच.जि.प. मध्ये गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली. उपलब्ध निधी नसताना जास्तीच्या कामांना प्रशासकीय मंजुऱ्या दिल्या. मात्र, बहुतांश कामे सत्ताधाऱ्यांतील बड्या नेत्यांची आहेत. विरोधी बाकावरील भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनीही वित्त आयोग, झेडपीआरमध्ये दबदबा राखला आहे. तत्कालीन सीईओंना निलंबनाला सामोरे जावे लागले आहे. विशेष लेखा परिक्षणाचा ससेमिरा मागे लागलेला असताना काही पदाधिकारी रद्द झालेली कामे पुनर्जिवीत करुन बिले उचलण्याच्या तयारीत आहेत. अध्यक्ष विजयसिंह यांनी ‘नियम म्हणजे नियम’ हा मंत्र जपल्याने त्यांच्यावर ‘अविश्वास’ दाखवला जात असल्याचे सांगितले जाते.
अविश्वासामागे दडले पदाधिकाऱ्यांचे ‘इंटरेस्ट’!
By admin | Updated: April 3, 2015 00:42 IST