विलास भोसले , पाटोदा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीसह गावठी दारू, जुगार अड्डे, मटका अड्डे, विनापरवाना ढाब्यावर दारूविक्री अश अवैध धंद्यांचा सध्या सुकाळ आहे. लाजिरवानी बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरून अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. पाटोदा तालुक्यात निवडणूक काळात काही काळ अवैध धंद्यांना पायबंद घातला होता. निवडणुका होताच अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू झाले आहेत. पाटोदा तालुक्यात पाटोदा आणि अंमळनेर असे दोन पोलीस ठाणे आहेत. पाटोदाअंतर्गत शिरूर तालुक्यातील काही भाग येतो. तर अंमळनेर ठाण्यांतर्गत आष्टी आणि शिरूर तालुक्यातील काही भाग येतो. या दोन्ही ठाण्यांच्या हद्दीत सध्या अनेक ठिकाणी गावठी दारूचे अड्डे, अनेक ढाब्यावर विनापरवाना देशी- विदेशी दारूची विक्री होत आहे. तर अनेक गावांमध्ये दिवसा ढवळ्या जुगार अड्डे सुरू आहेत. हॉटेलवर चहा मिळावा त्याप्रमाणे तालुक्यातील कोणत्याही ठिकाणी विनापरवाना दारू मिळत असल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. तर अनेकांचे संसार मटका, पत्ते यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. या सर्व अवैध धंद्यांची पोलीसांना माहिती आहे. मात्र कारवाई होत नसल्याने पोलीस व अवैध धंदेवाल्यात चिरीमिरीचा व्यवहार होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. पोलीस आणि अवैध धंदेवाल्यात असे लागेबांधे असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस व अवैध धंदेवाल्यांमधील ‘सख्य’ तसेच अवैध धंदेवाल्यांना ‘राजाश्रय’ मिळत असल्याचा आरोपही होत आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक पोलीस कर्मचारी अवैध दारू विक्री करणार्या हॉटेल, ढाब्यावरील ग्राहक असल्याचेही ग्रामस्थांतून सांगण्यात येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पाटोदा पोलीस ठाण्यासमोरूनच दिवसाढवळ्या अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. या अवैध धंद्यांना चाप लावण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. या संदर्भात पाटोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डंबाळे म्हणाले की, अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करत आहोत. असा प्रकार समोर आल्यास कारवाई करू.
ठाण्याजवळून अवैध प्रवासी वाहतूक
By admin | Updated: June 1, 2014 00:30 IST