लातूर : गौण खनिजाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांविरूध्द महसूल विभागाने कारवाई मोहिम हाती घेतली आहे़ मंगळवारी सकाळी तहसीलदार संजय वारकड यांनी अचानक वाहन तपासणी सुरू केली असता मुरूम व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे़ शासनाची रॉयल्टी बुडवून अवैधरित्या मुरूड, दगड व वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे़ खोपेगाव, कव्हा, साई चौक आदी भागात तहसीलदार संजय वारकड यांनी पथकासह अवैध मुरूम वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकला़ त्यात साई चौक अवैध वाळू वाहतूक करणारे दोन टिप्पर व खोपेगाव-कव्हा शिवारात मुरूमाची वाहतूक करणारा एक टिप्पर तहसीलदारांनी पकडला़ अवैधरित्या गौण खनिजाची विक्री करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी कडक भूमिका घेतली आहे़ पथकाने पकडलेले तिन्ही टिप्पर दिवसभर तहसीलच्या आवारात उभे होते़ रात्री दंडात्मक कारवाई करून सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले़
गौण खनिजाची अवैध वाहतूक
By admin | Updated: November 25, 2015 00:21 IST