बीड : दारू, जुगार, मटका, अंमली पदार्थ विक्री अशा अवैध धंद्यांतील टोळ्यांवर सध्या पोलीस प्रशासनाची वक्रदृष्टी आहे. चार दिवसात मटका घेणाऱ्या दोन टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. आणखी चार टोळ्या अधीक्षकांच्या निशाण्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.अवैध धंद्यांमुळे अनेकांचा संसार उध्दवस्त होत असून, त्यामुळे तरूणाई गुन्हेगारीच्या मार्गावर जात असल्याचे निदर्शनास आले. अशा धंद्यांतील आरोपींवर वारंवार गुन्हे दाखल करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यामुळे आता या धंद्यांतील बड्या माशांसह त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पंटरांना कायमचा धडा शिकविण्यासाठी अधीक्षक अनिल पारसकर यांनी हद्दपारीची धडक मोहीम उघडली आहे. बीड उपविभागावर अधीक्षकांनी लक्ष केंद्रीत केले आहे. मटका, जुगार घेणाऱ्या व अवैध दारू विकणाऱ्या टोळ्यांची माहिती उपअधीक्षक गणेश गावडे यांच्याकडून मागविली असून, या टोळ्यांची सुनावणी घेत कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांच्यावर थेट हद्दपारीची कारवाई केली जात आहे. (प्रतिनिधी)
अवैध धंदेवाले निशाण्यावर
By admin | Updated: June 18, 2016 00:59 IST