गंगापूर :
शहराच्या मलशुद्धीकरण प्रकल्पासाठी गंगापूर नगर परिषदेतर्फे ईदगाह मैदान व कब्रस्थानाला लागून बेकायदेशीर मार्गाने जमीन खरेदी केली आहे. यात शासन नियमांचे उल्लंघन झाले असल्याने याविरोधात आवाज उठवला जाईल, असा इशारा काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिला.
नगरपालिकेने सर्व्हे न.१४७ मध्ये कब्रस्थानाच्या बाजूलाच, दरगाहसमोर दोन एकर तर २४६/२ मध्ये ईदगाह मैदानाच्या मागे एक एकर क्षेत्र मलशुद्धीकरण केंद्रासाठी खरेदी केले आहे. सदरील जागा ही कोणत्याही लोकवस्ती,धार्मिक स्थळ, शैक्षणिक क्षेत्र व स्मशानभूमीपासून कमीत कमी सहाशे मीटर लांब असणे शासनाच्या नियमानुसार बंधनकारक आहे. असे असताना जिल्हाधिकारी, भूसंपादन व भूजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांची दिशाभूल करून सदरील जमिनींचा व्यवहार झाला असल्याने यामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार आहे. शिवाय मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या जाणार असल्याने याविरोधात काँग्रेस, मुस्लीम समाज व दर्गा समिती आवाज उठविणार असल्याचे पत्रकार परिषदेत संजय जाधव यांनी सांगितले. यावेळी माजी नगराध्यक्ष फैसल चाऊस, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अहेमद पटेल, नगरसेवक ज्ञानेश्वर साबणे, योगेश पाटील, बदर जहुरी आदी उपस्थित होते.