लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विद्यार्थिनींची पायपीट होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील तीन तालुक्यांत मानव विकास मिशन अंतर्गत मोफत बसची सुविधा आहे. शाळा उघडण्यापूर्वी बसचे मार्ग निश्चित होणे गरजेचे होते. मात्र सेनगाव वगळता औंढा व हिंगोली येथील बसमार्ग निश्चिती अहवाल अद्याप अप्राप्त आहे. त्यामुळे सध्या पूर्वीच्याच मार्गावरून बस धावत आहेत.हिंगोली येथील आगारातून मानव विकासच्या एकूण २१ बस विद्यार्थिनींची शाळेत ने-आण करतात. विद्यार्थिनींना सेवा पुरविणाऱ्या बसेसची दरवर्षी मार्गनिश्चिती केली जाते. शिवाय विद्यार्थिनींची संख्या लक्षात घेऊन नवीन मार्गाने बस पाठविण्याचे नियोजन केले जाते. मानव विकास कार्यालयातर्फे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना मार्ग निश्चतीबाबत पत्र पाठविण्यात आले. त्या अनुषंगाने ३० मे रोजी हिंगोली येथे बैठक घेण्याचे ठरले होते. औंढा येथे ३ जून तर सेनगाव येथे ६ जून अशा तारखा संबधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात आल्या होत्या. शिवाय संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळा उघडण्यापूर्वी म्हणजेच १४ जून रोजी सदर मार्ग निश्चतीचा अहवाल मानव विकासकडे देणे अनिवार्य होते. परंतु सेनगाव वगळता दोन्ही तालुक्यांच्या गशिअ यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थिनींची बसअभावी गैरसोय होत आहे.याकडे मात्र शिक्षणाधिकारी लक्ष देण्यास तयार नाहीत. तर यंत्रणाही गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.
मानव विकासच्या बस रूटकडे दुर्लक्ष
By admin | Updated: June 16, 2017 23:23 IST