मुंबई : दहीहंडी उत्सवासाठी गोविंदा पथकांच्या सरावाला उत्साहात सुरुवात झाली आहे. मात्र तरीही अंतिम मसुदा सुपुर्द करून दहीहंडी धोरण निश्चितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचे याचिकाकर्त्या स्वाती पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे ऐन उत्सवाच्या तोंडावर धोरणाबाबत गोविंदा पथकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.दहीहंडी समन्वय समिती आणि शासकीय समितीने जुलै महिन्यात दहीहंडीचा अंतिम मसुदा शासनाकडे पाठविला. परंतु, यावर अजूनही ठोस पाऊल न उचलता मसुदा ‘जैसे थे’ परिस्थितीत आहे. त्यामुळे गोविंदाचे वय आणि हंडीच्या उंचीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दहीहंडीच्या धोरण निश्चितीवर आॅगस्टच्या मध्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती स्वाती पाटील यांना शासनाकडून देण्यात आली. त्यामुळे या धोरणाच्या माध्यमातून उत्सवाबाबत संभ्रम निर्माण करून त्याचे राजकीय भांडवल होण्याचीच शक्यता आहे. तरी असे न करता, अंतिम टप्प्यात असलेले हे धोरण शासनाने लवकरात लवकर जाहीर करून दहीहंडी मंडळ आणि गोविंदांच्या मनातील शंकांचे निरसन करावे, असेही पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दहीहंडीचे धोरण ‘त्रिशंकू’ अवस्थेत असताना दुसरीकडे मात्र काही नामांकित गोविंदा पथकांनी उंचच्या उंच थर लावण्यासाठी कसून सराव सुरू केला आहे. शिवाय, या थरांवर चढण्यासाठी एक्क्यांचा शोधही सुरू झाला आहे. शहर-उपनगरातील अनेक गोविंदा पथकांचे सराव मैदानात किंवा थेट डांबरी रस्त्यांवर सुरू आहेत, त्यामुळे अशा ठिकाणी सुरक्षेचा मोठा अभाव दिसून येत आहे. शिवाय, गेल्या काही वर्षांपासून सरावादरम्यान गोविंदा जखमी होणे आणि मृत्यू होण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे पुन्हा गोविंदा पथके गेल्या वर्षीचाच कित्ता गिरवणार की फडणवीस सरकार या जीवघेण्या स्पर्धेला आळा घालणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
दहीहंडीच्या धोरण निश्चितीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
By admin | Updated: August 5, 2015 00:42 IST