औरंगाबाद : बसमध्ये पाकीट मारताना नागरिकांनी रंगेहाथ पकडल्यानंतर तीन चोरट्यांनी सिडको बसस्थानकावर दुपारी चांगलाच हैदोस घातला. तेथील केबिनच्या काचा फोडून त्या काचा हातात घेत ‘कोई आगे आये तो चीर डालेंगे...’ असे धमकावत चोरट्यांनी ‘फिल्मी स्टाईल’ पलायन केले; परंतु पोलीस आणि नागरिकांनी पाठलाग करून त्यातील दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. दुपारी चार ते साडेचार वाजेच्या सुमारास हा ‘फिल्मी स्टाईल’ ड्रामा घडला...पकडण्यात आलेल्या चोरट्यांमध्ये शेख वसीम शेख सलीम (२३, रा. चंपाचौक, रहेमानिया कॉलनी) व शेख अलीम शेख शौकत (२८, रा. बायजीपुरा) यांचा समावेश आहे. त्याचे झाले असे की, सिडको बसस्थानकावर औरंगाबाद- वाशिम ही बस दुपारी चार वाजेच्या सुमारास उभी होती. त्यात प्रवासी चढ-उतार करीत होते. विलास इंगळे हे मेहकरला जाण्यासाठी या बसमध्ये चढले. त्याचवेळी गर्दीची संधी साधून शेख वसीम, शेख अलीम व त्यांच्या आणखी एका साथीदाराने त्यांचे पाकीट मारले. हा प्रकार लक्षात येताच बसमधील इतर प्रवाशांनी या चोरट्यांना रंगेहाथ पकडले.