औरंगाबाद : मराठी साहित्य आणि मराठी भाषेसाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहणार असून, पिंपरी- चिंचवड येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवोदितांना लिहिते करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे प्रतिपादन ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांनी आज येथे केले. भारतीय भटक्या विमुक्त जमाती आदिवासी विकास संघटना आणि अस्मितादर्श परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ८९ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील यांचा जाहीर सत्कार शनिवारी सायंकाळी मसापमध्ये झाला. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते डॉ. पाटील यांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. व्यासपीठावर यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, प्राचार्य रा. रं. बोराडे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, मधुकरअण्णा मुळे, प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, मसापचे माजी कार्यवाह कुंडलिक अतकरे, दादा गोरे, अरुण शेवतेकर, सचिन इटकर, ‘लोकमत’चे संपादक चक्रधर दळवी, डॉ. ऋषिकेश कांबळे, आमिनभाई जामगावकर, डॉ. बाळासाहेब पवार आदींची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना डॉ. पाटील म्हणाले की, मराठवाडा ही संतांची भूमी समजली जाते. थोर साहित्यिकांच्या हस्ते आज माझा सत्कार झाला आहे. यानिमित्ताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षांचा सत्कार करण्याची प्रथा मराठवाड्याने पहिल्यांदाच सुरू केली आहे, हे मी कधीही विसरू शकणार नाही. यापुढे मराठी भाषा आणि मराठी साहित्यासाठी योगदान देण्याचा आमचा प्रयत्न राहील. पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या संमेलनाचा संपूर्ण खर्च आम्हीच करण्याचे ठरविले आहे. या संमेलनातून तरुणांनी काहीतरी शिकले पाहिजे. पहिल्यांदाच अॅनिमेशनचा वापर करून संमेलनाचे बोधचिन्ह तयार करण्यात आले आहे. संमेलनाची स्वतंत्र वेबसाईट व अॅपची निर्मिती करण्यात आली आहे. ज्यामुळे घरी बसल्या संमेलनात काय चालले आहे, त्याचा अनुभव घेता येईल. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पानतावणे म्हणाले की, आतापर्यंत कधीही साहित्य संस्थांनी संमेलनाच्या स्वागताध्यक्षांचा सत्कार करण्याची प्रथा निर्माण केलेली नाही. ही प्रथा औरंगाबादने पहिल्यांदा सुरू केली. शिक्षण क्षेत्रात नव्या जाणिवा, नवे भान निर्माण करण्याची जबाबदारी पी. डी. पाटलांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये दिसते. पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणारे साहित्य संमेलन वेगवेगळ्या चर्चेला वाव देणार नाही, याची मला खात्री आहे. या संमेलनातून बाहेर पडताना वाङ्मयीन स्वरुपाचीच चर्चा घडेल. नवोदितांची सतत उपेक्षाच होत असते. या संमेलनाच्या माध्यमातून त्यांना काही देण्याचा प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षाही डॉ.पानतावणे यांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले की, ज्यांनी लोककला जिवंत ठेवली त्यांनी एका मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षांना आज मिरवणुकीने व्यासपीठावर नेले ही ऐतिहासिक घटना आहे. पी. डी. पाटलांनी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील साहित्यिकांच्या घरी जाऊन संमेलनाचे निमंत्रण दिले, हा मराठी साहित्यामध्ये त्यांनी इतिहास घडवला आहे. यामुळे ग्रामीण भागातील साहित्यिक पुढे येतील. नवनवीन मुलांना लिहिण्यास प्रोत्साहन मिळेल. प्रास्ताविक मसापचे कार्यवाह दादा गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. प्रा. कैलास इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वागताध्यक्षांच्या सत्काराची प्रथा सुरू सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात संमेलन कुठे व्हावे यासाठी उस्मानाबाद आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या स्पर्धेविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, साहित्य मंडळांनी आतापर्यंत कधीही संमेलनाच्या स्वागताध्यक्षांचा सत्कार केलेला नाही. स्वागताध्यक्ष सत्कार स्वीकारत गावोगाव हिंडत राहिले, तर संमेलनाच्या तयारीचे काय होईल, अशी चिंता असल्यामुळे कदाचित स्वागताध्यक्षांच्या सत्काराची प्रथा नसावी; पण या निमित्ताने ही प्रथा सुरू झाली ही आनंदाची बाब आहे. संमेलनाध्यक्षांना ५ लाखांचा निधी देत आहात ही चांगली बाब आहे. याशिवाय मराठी भाषेच्या विकासासाठीही आर्थिक योगदान द्यावे.
नवोदितांना लिहिते करण्याचा विचार
By admin | Updated: December 20, 2015 00:09 IST