गल्लेबोरगाव : परिसरात यंदा मक्यापाठोपाठ कपाशीची लागवड झाली आहे. मात्र, कपाशीच्या उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त झाल्याने ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या’ अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. येथील एका शेतकऱ्याने एक एकर कपाशीवर ३० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च केला. चांगल्या उत्पन्नाची आशा असताना केवळ दहा हजार रुपयांचे उत्पन्न हाती आल्याने सर्व मेहनत वाया गेली. परिसरातील जवळपास शेतकऱ्यांची अशीच दुर्दशा झाल्याने त्यांचे अर्थकारण बिघडले आहे.
गल्लेबोरगाव परिसरात जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली होती. सुरुवातीपासून पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनीही उत्साहाने खते, फवारणी, कोळपणी, वेचणी आदींबाबत हात अखडता न घेता खर्च केला. मात्र, हा आनंद अतिपावसाने हिरावून नेला. यात कपाशी पिकाला प्रचंड फटका बसला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या मनात आशा उत्पन्न झाली व त्यांनी पिवळ्या पडलेल्या कपाशीवर खर्च करून पुन्हा कपाशीला उभारी दिली. मात्र, ऐन भरात असताना बोंडअळीने पुन्हा हल्ला केला. यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. एक ते दोन वेचणीतच कपाशीचे तीन तेरा वाजले आहेत.
गल्लेबोरगाव येथील शेतकरी रावसाहेब बोडखे यांनी त्यांच्या शेतात कपाशी लागवड, खते, फवारणी, कोळपणी, वेचणी यासाठी एकरी सुमारे ३० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. मात्र, त्यांच्या हाती केवळ दहा हजार रुपयांचे उत्पन्न लागले आहे. त्यानंतर बोंडअळीमुळे त्यांचा लागवड खर्चही निघालेला नसल्याने ते अडचणीत आले आहेत.
कोट
कपाशी पिकावरच आमची भिस्त होती. आम्ही ३० हजार रुपयांपर्यंत खर्च केला. अगोदर अतिपावसाचा फटका व नंतर बोंडअळीचा कहर यामुळे कपाशीचे तीन तेरा वाजले आहेत. उत्पन्न केवळ दहा हजार रुपयांचे हाती आले आहे.
रावसाहेब बोडखे, शेतकरी
कोट
एकरी किमान १३ ते १५ क्विंटलपर्यंत उत्पन्न व्हायचे. बोंडअळीमुळे ते आता दोन ते तीन क्विंटलपर्यंत खाली आले आहे. त्यात एक ते दोन वेचणीतच कापसाच्या पऱ्हाट्या झाल्या आहेत. यावर्षी खर्चही पाण्यात गेला.
- अशोक चंद्रटिके, शेतकरी
फोटो कॅप्शन : कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने ट्रॅक्टरद्वारे कपाशी नष्ट करताना शेतकरी.