‘गाजराची पुंगी’ या नाटकाच्या ५० व्या प्रयोगाला माझे गुरू प्रा. कमलाकर सोनटक्के हजर होते. त्यावेळी ते म्हणाले की, ‘बरेच शिष्य आपल्या गुरूच्या नावाने ओळखले जातात. मी मात्र, असा भाग्यवान गुरू आहे जो या शिष्याच्या नावाने ओळखला जातो.’दिलीप घारे ल्ल नाट्यक्षेत्रातील माझे गुरू ज्यांना नुकताच संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला ते प्रा. कमलाकर सोनटक्के (७३). माझे व त्यांचे गुरू-शिष्याचे नाते एवढे घट्ट जमले आहे की, आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात असतो. लहानपणी अंबाजोगाई येथे असताना कलेची आवड निर्माण झाली होती. योगेश्वरी महाविद्यालयात प्रा. केशव देशपांडे यांच्यामुळे मला नाट्यक्षेत्रात काम करण्याची गोडी निर्माण झाली. नाटकाचे प्राथमिक धडे देशपांडे गुरुजींकडून शिकलो. प्राणिशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमासाठी औरंगाबादेत विद्यापीठात प्रवेश केला. १९७४ मध्येच विद्यापीठात नाट्यशास्त्र विभागाची सुरुवात झाली होती. या विभागाचे प्रमुख प्रा. कमलाकर सोनटक्के होते. त्यांनीच माझ्यावर नाट्यशास्त्राचे संस्कार केले. नाटकातील तंत्र अन् मंत्र सर्व काही त्यांनीच शिकविले. एकीकडे प्राणिशास्त्राचा अभ्यास आणि नंतर नाटकांच्या तालमीमध्ये मी जाऊन बसत असे. यामुळे नाटकातील सर्व पात्रांचे डायलॉग तोंडपाठ झाले होते. प्रा. सोनटक्के सरांचा आवडता शिष्य होण्याची मजेशीर आठवण जी आजही मला प्रेरणादायी ठरते. ‘अंधायुग’ या नाटकाचा खूप महत्त्वाचा प्रयोग मराठवाडा औद्योगिक मंचने आयोजित केला होता. नाटक पूर्ण तयार होते अन् अचानक ‘विदुर’ या मुख्य पात्राची भूमिका करणारा नायक अपरिहार्य कारणामुळे प्रयोगाच्या तीन दिवस आधी नाटकाची तालीम सोडून गेला. विदुरचे सर्व डायलॉग मला मुखोद्गत होते. नायकाची संधी मला मिळाली. गंमत म्हणजे, माझा पहिल्या नाटकाचा प्रयोग अत्यंत बहारदार झाला. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचा खुला रंगमंच परिसर तुडुंब भरला होता. तेव्हापासून मी सोनटक्के गुरुजींचा आवडता शिष्य बनलो.
मी घडलो गुरुंमुळेच!
By admin | Updated: July 12, 2014 00:53 IST