उस्मानाबाद : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या तालुक्यातील घोगरेवाडी येथील शेतकऱ्यांना डोंबिवली येथील विवेकानंद सेवाभावी संस्थेने मदतीचा हात दिला असून, या संस्थेच्या वतीने साडेतीनशे शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे व खतांचे वाटप नुकतेच करण्यात आले. गेल्या दोन-तीन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेती पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. सध्या खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून, पैशांअभावी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत डोंबिवली येथील या संस्थेने सुमारे ८० हजार रूपये किमतीचे बी-बियाणे, जैविक खते देऊन शेतकऱ्यांना आधार दिला आहे. घोगरेवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात हा खत, बियाणे वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी विकास अधिकारी डी. आर. जाधव, प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब सावंत, कृषी पर्यवेक्षक बी. ए. पाटील, संस्थेचे अध्यक्ष केतन बोंदर, मंडळ कृषी अधिकारी ए. पी. चिक्षे आदी उपस्थित होते. यावेळी संस्थाध्यक्ष बोंदर यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून संस्थेने हा मदतीचा हात दिल्याचे सांगून गावकऱ्यांनी एकजुटीने काम करून गावचा विकास साधावा. आधुनिक तंत्र व मार्केटींगचा अभ्यास करूनच शेतीचे उत्पन्न घ्यावे असे सांगितले. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी जाधव यांनी केले. कार्यक्रमास विवेकानंद संस्थेचे उपाध्यक्ष रवी वारंग, कोषाध्यक्ष शैलेश निपुलग आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक के. जी. सुरवसे यांनी केले तर चिक्षे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)मॉडेल गाव बनवूयावेळी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी घोगरेवाडी गाव मॉडेल गाव करून या गावच्या शेतीच्या विकास कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करणाऱ्यांवर भर द्यावा. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या संपर्कात राहून शेतीचे नवनवीन तंत्रज्ञात आत्मसात करून आपला आर्थिक विकास साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
साडेतीनशे शेतकऱ्यांना मदतीचा हात
By admin | Updated: June 29, 2014 00:38 IST